दिल्लीत यमुनेची पातळी घटली पुराचा धोका टळला

214

दिल्लीत गेले तीन दिवस रौद्ररूप धारण करणारी यमुना नदी आता शांत झाली असून दिल्लीकरांवरचा पुराचा धोका आता टळला आहे. यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडून 207 मीटरची रेषा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु पाण्याची पातळी 206 पर्यंतच पोहोचली. त्यानंतर हळूहळू ही पातळी घटत चालल्याने भयंकर पूरस्थिती निर्माण झाली नाही.

पाण्याची पातळी 206.6 मीटरपर्यंत पोहोचल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. आतापर्यंत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून हजारो लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी तात्पुरते शेड असलेल्या घरांमध्ये हलवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी नदीने 205.33 मीटरची धोक्याची पूररेषा ओलांडली होती. दिल्ली प्रशासनाने आतापर्यंत सखल भागांतील 15 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांच्यासाठी तात्पुरती शेड असलेली घरे उभारण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून यमुना नदीवरील पूल तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. गेले काही दिवस पंजाब आणि हरयाणात झालेल्या मुसळधार पावसाने या दोन्ही राज्यांत पूर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी हरयाणातील हाथिनीपुंड कालव्यातून 16280 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे दिल्लीला पुराचा धोका निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या