युवा बॅडमिंटनपटूचे घवघवीत यश, पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची करामत

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचा उगवता तारा 18 वर्षीय यश सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पणातच कास्य पदक पटकावले. युरोपमधील क्रोएशियामध्ये 19 वर्षांखालील वयोगटात ही आंतरराष्ट्रीय वॅलामार फ्युचर सीरिज स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानी बॅडमिंटन संघटनेच्या वतीने यश सूर्यवंशी याला निवडले होते. मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेत यश सूर्यवंशीने आपल्या कारकीर्दीतला सर्वोत्तम खेळ केला आणि तिसरा क्रमांक पटकावला.

यश सूर्यवंशीने पहिल्या फेरीत साऊथ अमेरिका देशाच्या एड्रियनो व्हिएल या  खेळाडूचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत 3 सेटमध्ये पराभव केला. दुसऱया फेरीत यश सूर्यवंशीने इंग्लंडच्या आदर्श पलानी कुमार याचा 21-24, 21-14 अशा सेटमध्ये पराभव केला. यानंतर तिसऱया फेरीत त्याने नॉर्वेच्या थॉमस बेर्थसमोर उत्तम कामगिरी करत 21-12, 21-15 अशा विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

इंग्लंडच्या हॅरी जोन्ससोबत खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याने 21-7, 21-10 अशा सेटमध्ये एकहाती सामना जिंकत आपल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय पदकाची सुनिश्चिती केली. यशला उपांत्य फेरीत अतिशय चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या योहान बारेरीकडून पराभव स्वीकारावा लागला.

यश हा मूळ सांगली जिह्याच्या इस्लामपूर या गावचा.  बॅडमिंटनमध्ये करीअर करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी त्याला ठाणे बॅडमिंटन अॅपॅडमीमध्ये श्रीकांत वाड व अन्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून ठेवले आहे. प्रथम जिल्हास्तरावर, मग राज्य स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर किताब मिळवून त्याने आपला ठसा उमटवला आहे. यावेळी यश म्हणाला, गुरू श्रीकांत वाड यांच्याबरोबरच मयूर, अक्षय, कबीर आणि विघ्नेश या सर्वांचाच माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.  ठाणे अॅपॅडमीने मला मोठे केले आहे हेही तो आवर्जून सांगतो.