जिंकलंस पोरा! वयाच्या 17 व्या वर्षी ‘वन डे’मध्ये झळकावले द्विशतक

7153

एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरोधी संघाला पाणी पाजत असताना क्रिकेटची नवी पिढी घरगुती स्पर्धांमध्ये तयार होताना दिसत आहे. बीसीसीआय अंतर्गत येणाऱ्या ‘विजय हजारे ट्रॉफी’ स्पर्धेत मुंबईच्या यशस्वी जयस्वाल याने तुफानी खेळी करत इतिहास रचला. मुंबई आणि झारखंडमध्ये झालेल्या लढतीत जयस्वालने द्विशतक ठोकले. सर्वात कमी वयात द्विशतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान जयस्वालच्या नावावर जमा झाला आहे.

यशस्वी जयस्वालने झारखंडविरुद्ध 154 चेंडूत 131.83 च्या सरासरीने 203 धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 17 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीसह अनेक विक्रन त्याने आपल्या नावावर केले आहेत. जयस्वालचे 17 वर्ष आणि 292 दिवस आहे.

28 डिसेंबर, 2001 रोजी जन्मलेल्या जयस्वाल 21 व्या शतकात द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यासह विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचा अनोखा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे. जयस्वालने आपल्या द्विशतकी खेळीदरम्यान तब्बल 12 वेळा चेंडूला सीमापार आसमान दाखवले.

यंदाच्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी संजू सॅमसन याने केरळकडून खेळताना गोवाविरुद्ध द्विशतक ठोकले होते. संजूने 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकारांसह व 164.34 च्या सरासरीने 212 धावांची खेळी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या