आझाद मैदानबाहेरील पाणीपुरी विक्रेता ते टीम इंडियाची निळी जर्सी, ‘यशस्वी’च्या यशाची कहानी

976

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा झाली. या संघात मुंबईकर यशस्वी जयस्वाल याचीही वर्णी लागली. यशस्वीचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर असाच राहिला आहे. एकेकाळी आझाद मैदानाबाहेर कुटुंबीयांसोबत पाणीपुरी विकणारा हा मुलगा आता टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत मैदान गाजवताना दिसेल.

‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावल्यानंतर निवड समितीचे लक्ष वेधून घेणाऱ्या यशस्वीला लॉटरीच लागली आहे. 17 वर्ष, 292 दिवसांच्या यशस्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना 154 चेंडूत 12 षटकार आणि 17 चौकारांसह 203 धावांची द्विशतकी खेळी केली होती. संपूर्ण स्पर्धेत त्याने 564 धावा चोपल्या. यानंतर त्याची थेट दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपसाठी निवड झाली.

यशस्वी वयाच्या 11 व्या वर्षी आपल्या कुटुंबीयांसह उत्तर प्रदेशमधून मुंबईत आला. मोठा क्रिकेटर व्हायचं हा एकच विचार त्याच्या मनात होता. पण म्हणतात ना, संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हेच खरे. यशस्वीने मुस्लिम युनायटेज स्पोर्ट क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली आणि यासोबत तो आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी आणि फ्रुट प्लेटची विक्री करायचा.

आपल्या या प्रवासाबाबत आयसीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यशस्वी सांगतो, ‘मला क्रिकेट आवडते आणि यातून मला आनंद मिलतो. मी सचिनची बॅटिंग पाहात मोठा झालोय आणि मलाही मुंबईकडून खेळायचे होते. मी जेव्हा मुंबईला आलो तेव्हा वडिलांसोबत आझाद मैदानला जायचो. मी सरावही सुरु केला, तेव्हा वडिलांनी मला पुन्हा यूपीला जायला सांगितले मात्र मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.’

yashasvi-jaiswal

टेंटमध्ये उन्हाळा, पावसाला आणि हिवाळा या ऋतूंचा सामना करणे अवघड होते. तिथे लाईट आणि संडासही नव्हता. मात्र मी क्रिकेट खेळणे सुरू ठेवले. त्यावेळी मी घरच्यांना मदत म्हणून सायंकाळी पाणीपुरी विकायचो आणि थोडे पैसेही कमावचो, असेही यशस्वी सांगतो. अनेकदा माझे मित्र पाणीपुरीच्या स्टॉलवर यायचे तेव्हा मला लाज वाटायची. सकाळी मी मैदानात शतक साजरे करायचो आणि सायंकाळी मैदानाबाहेर पाणीपुरी विकायचो, तेव्हा मला वाईटही वाटायचे. परंतु हे काम छोटे असले तरी माझ्यासाठी महत्त्वाचे होते. परंतु आता मी पूर्णत: क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीय केले आहे, असेही तो म्हणाला.

आझाद मैदानावर सराव करत असताना ज्वाला सरांनी मला पाहिले आणि त्यांनी मला तू येथे काय करतोय असे विचारले. यानंतर माझे आयुष्य बदलून गेले. माझ्याकडे खाण्यासही पैसे नव्हते, मात्र सरांनी मला क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीय करण्यास सांगितले व त्यांनी माझी काळजी घेतले, असेही यशस्वी सांगतो. 2019 ला विजय हजारे ट्रॉफीसाठी माझी निवड झाली आणि मी सर्वात कमी वयात द्विशत झळकावण्याचा विक्रम केला, असेही तो सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या