आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान यशोधन इमारतीचा मजला सील

875

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चर्चगेट येथील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘यशोधन’ इमारतीचा एक मजला सील करण्यात आला आहे. संबंधित सोसायटीने पालिकेने दिलेले सर्व निर्देश पाळावेत असे आदेशही पालिकेकडून देण्यात आले आहेत.

चर्चगेट येथील यशोधन बिल्डिंगमध्ये अनेक सनदी अधिकारी राहतात. मात्र याच इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून ‘यशोधन’ सोसायटीला इमारतीचा संबंधित मजला सील करीत असल्याचे कळवले आहे. यानंतर सोसोयटी प्रशासनाने संबंधित सील केलेल्या भागात बाहेरील व्यक्तीला प्रवेश देऊ नये, प्रभावी निर्जंतुकीकरण करावे, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. सील केलेल्या भागातील रहिवाशांना अत्यावश्यक सेवा सोसोयटीकडून पुरवण्यासाठी सहकार्य करावे असेही निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पालिकेच्या नवीन नियमावलीनुसार कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण बिल्डिंग सील न करता संबंधित मजला सील करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या