हिंदुराष्ट्र करण्यासाठी काही लोकांचे षड्यंत्र सुरू, यशवंत सिन्हांची मोदी सरकारवर टीका

2637

देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकार धार्मिक मुद्दे पुढे करत आहेत. अर्थव्यवस्थेचे मोठे संकट देशावर असून आर्थिक मंदी सह नागरिकत्व कायद्याबाबत केंद्र सरकार पूर्णत: देशवासियांशी खोटं बोलत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आशिष देशमुख, डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले की, कोणाला नागरिकत्व द्यायचे हा अधिकार पूर्णपणे केंद्र सरकारचा आहे. आता या नव्या कायद्याची गरज नव्हती. परंतु पूर्णत: हिंदुराष्ट्र करण्यासाठी काही लोकांची षड्यंत्र सुरू आहे. या कायद्याने कुणालाही सुरक्षितता मिळणार नाही. जगामध्ये 54 देश इस्लामधर्मीय असून मोजक्या देशाबाबत हे धोरण का धरले? श्रीलंकेतील अल्पसंख्यांक बाबत आपण का बोलत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था हीच मोठी चिंता आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी 5 टक्के होऊ शकतो. जीडीपीची एक टक्के घसरण म्हणजे 2 लाख कोटींचे नुकसान. जीडीपी 8 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आला म्हणजे देशवासीयांच्या 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान. याबाबत सरकारला कोणताही मार्ग काढता येत नाही. या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी विषमतावादी धार्मिक मुद्दे पुढे करून सरकार जातीपातीचे राजकारण करत आहे, असा आरोप यशवंत सिन्हा यांनी केला.

महात्मा गांधींचे विचार आणि देशाचे संविधान संपवण्याचा त्यांचा डाव आहे. याविरुद्ध विद्यार्थी व लोक रस्त्यावर उतरत असून 3 हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा दिल्लीमध्ये केंद्र सरकारला जाब विचारणार आहे. केंद्राने राष्ट्रपतींच्या अभिभाषणात अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा कायदा मागे घेतल्याची घोषणा करावी व अर्थ व्यवस्थेसह सद्यस्थितीवर देशवासीयांची नेतृत्वाने खरे बोलावे असे आवाहनही यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या