यशवंत सिन्हांचा भाजपला रामराम

17

सामना ऑनलाईन । पाटणा

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी या आर्थिक धोरणावर आणि शेती  धोरणावर तुटून पडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. मित्रपक्ष सोडून जात असतानाच पक्षातील नेतेही सोडचिठ्ठी देत असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पाटणा येथे यशवंत सिन्हा यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रमंच’च्या कार्यक्रमाला भाजपचे नेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते. जदयु नेते उदयनारायण चौधरी, काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी, राजद नेते तेजस्वी यादव, ‘आप’चे संजय सिंह आणि आशुतोष सहभागी झाले होते. यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले, ‘आजपासून मी पक्षीय राजकारणातून संन्यास घेत आहे. भाजपशी असलेले सर्व संबंध मी तोडत आहे.’ सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढविला. देशाची लोकशाही धोक्यात आली असून आज जे काही सुरू आहे त्याविरुद्ध उभे राहिलो नाही तर येणाऱया पिढय़ा आपल्याला माफ करणार नाहीत. 

प्रशासकीय अधिकारी ते देशाचे अर्थमंत्री

आयएएस अधिकारी म्हणून २४ वर्षे काम केल्यानंतर १९८४ मध्ये यशवंत सिन्हा राजकारणात आले. दिवंगत माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला. १९८८ ला ते राज्यसभा खासदार बनले. १९८९ ला जनता दल निर्माण झाल्यानंतर ते सरचिटणीस झाले. नोव्हेंबर १९९० ते जून १९९१ या काळात चंद्रशेखर पंतप्रधान होते. तेव्हा सिन्हा अर्थमंत्री बनले. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही महत्त्वाची पदे सांभाळली. ते अनेकवेळा झारखंडमधील हाजारीबाग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. २०१४ ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पुत्र जयंत सिन्हा येथून निवडून आले. जयंत सिन्हा सध्या केंद्रात मंत्री आहेत.

देशात लोकशाही धोक्यात आली आहे. देशात आज जे सुरू आहे त्या विरोधात उभे राहिलो नाही तर येणाऱया पिढय़ा आपल्याला माफ करणार नाहीत.

– यशवंत सिन्हा

आपली प्रतिक्रिया द्या