‘सिन्हास्त्रा’मुळे भाजपची कोंडी, यशवंत सिन्हा गुजरात दौरा करणार

12

सामना ऑनलाईन । राजकोट

नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्द्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्ला करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आता गुजरात दौऱयावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ‘सिन्हास्त्र्ाा’मुळे भाजपची गुजरातमध्ये आणखी कोंडी होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसशी संबंधित ‘लोकशाही बचाओ अभियान’ या स्वयंसेवी संस्थेने सिन्हा यांच्या दौऱयाचे आयोजन केले आहे.

१४ नोव्हेंबरपासून तीन दिवस सिन्हा यांचा हा दौरा असणार आहे. राजकोट, अहमदाबाद आणि सुरतमधील व्यापारी, उद्योजकांशी सिन्हा चर्चा करणार आहेत. यावेळी सिन्हा जीएसटी आणि नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका यावर भाष्य करणार असून त्यांचे व्याख्यानही होणार आहे.

काँग्रेसची खेळी
गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला विधानसभेसाठी मतदान होत असून भाजपला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेसने ‘सिन्हास्त्र’ उपसल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. गुजरातमध्ये सुरतसह अनेक ठिकाणी व्यापाऱयांनी जीएसटीविरोधात आंदोलन केले होते. त्यामुळे सिन्हा यांच्या दौऱयात व्यापाऱयांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुजरात दौरा करून व्यापाऱयांशी चर्चा केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या