यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गोंधळ,दिल्लीतल्या त्रिमूर्तींची प्रतीक्षा आणि चेंगराचेंगरी

1772

महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू सध्या नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दररोजच्या बैठका आणि आज काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटीमुळे चव्हाण सेंटरकडे तर देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. दुपारपासून प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष दिल्लीतून मुंबईत दाखल झालेले मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे लागले होते. संध्याकाळी या त्रिमूर्तींचे आगमन होताच प्रचंड गोंधळ निर्माण झाला. चॅनेलच्या कॅमेरामनची प्रचंड रेटारेटी, चेंगराचेगरी असे चित्र होते.

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पवार यांचे ‘सिल्व्हर ओक’ हे निवासस्थान केंद्रस्थानी होते. मात्र मागील दोन दिवसांपासून नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.  आज काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते अहमद पटेल व के. सी. वेणुगोपाल हे नवी दिल्लीतून थेट यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चेसाठी येणार हे स्पष्ट झाल्यावर तर राष्ट्रीय पातळीवरील टीव्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी हजर झाले. मुंबईत विमानतळावर नवी दिल्लीतील नेते आल्याचा मेसेज चव्हाण सेंटरमध्ये पत्रकारांना आला. काही वेळाने या तीन नेत्यांच्या मोटारींचा ताफा चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाला तेव्हा पत्रकारांची प्रचंड गर्दी पाहून या तीन नेत्यांनाही धक्काच बसला. मोटारीतून ते खाली उतरताच अभूतपूर्व गोंधळ उडाला. टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांनी ‘बाईट’ घेण्यासाठी दिल्लीतल्या या तीन नेत्यांकडे धाव घेतली. फोटोग्राफर्सच्या कॅमेऱयांचे फ्लॅश लखाखले.  प्रचंड चेंगराचेंगरी झाली. अखेर काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कडे करून पाचव्या मजल्यावर नेले.

आपली प्रतिक्रिया द्या