
>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ
देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासनाकडून, पोलिसांकडून जनजागृती करूनही अल्पावधीत पैसे कमावण्याच्या नादात अनेक जणांचे नुकसान होते. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहेस. येथील एका तरुणाला घरबसल्या लाखो रुपये कमवा असा मेसेज आला होता. याला बळी पडून तरुणाने टेलिग्राम ग्रुपच्या लिंकवरील दिलेले टास्क पूर्ण केले आणि तब्बल 11 लाख रुपये गमावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मिश्रा असे या तरुणाचे नाव आहे. त्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळाला होता. त्याता श्वेता राणा या युवतीने पेट्रोल कोपें लिमिटेड कंपनीत व्हिडीओ क्रिएटर असल्याचे सांगितले आणि या कंपनीकडून रोज एक टास्क दिला जाईल असे म्हटले. व्हिडीओला लाईक मिळाल्यावर प्रत्येक लाईकवर 50 रुपये मिळतील. शिवाय 150 रुपये बोनसही मिळेल असे सांगितले. या टास्कसाठी होकार देताच तरुणाला टेलिग्राम ग्रुपची लिंक पाठवण्यात आली.
सुरुवातीला विश्वास जिंकण्यासाठी तरुणाला काही पैसेही मिळाले. यानंतर मात्र कंपनीने वेगवेगळ्या कारणांसाठी प्रशांतकडे पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला स्वत:चे व नंतर मित्रांकडून उधारी घेऊन त्याने तब्बल 11 लाख रुपये भरले. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अवधूतवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी लोकांनी त्यांची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये. तसेच, तुमचे बँक खाते, एटीएम, फोन पे, पेटीएम, गुगल पे, फोन बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग इत्यादींसाठी साधे पासवर्ड तयार करू नका. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर जास्त बोलू नका, अनोळखी नंबरवरून आलेल्या व्हिडीओ कॉलवर किंवा मेसेजवर कोणत्याही प्रकारचे बोलू नका किंवा प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन केले आहे.