Yavatmal News : चिल्लीमध्ये झालेल्या 33 लाखांच्या दरोड्याची उकल, गुन्हे शाखेने आरोपींना केले गजाआड

>>प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात वास्तव्यास असलेल्या पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यात तब्बल 30 लाख रुपयांची रोकड आणि 20 तोळे सोनं दरोडेखोरांनी लंपास केलं होते. त्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण होते. या दरोड्याची उकल करण्यात स्थनिक गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी दोन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.

महागांव तालुक्यातील सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. पांडे कुटुंबीय शेतकरी असून महागांव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात गेल्या 60 वर्षांपासून वास्तव्याला आहेत. जंगलात त्यांचा एक मोठा वाडा असून त्यांची वडिलोपार्जित 50 एकर शेती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पांडे कुटुंबाने कापूस विकला होता. कापूस विकून मिळालेली रक्कम आणि घरातील सोनं असा ऐवज पांडे कुटुंबाच्या घरातील कपाटात ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास 6 दरोडेखोर झाडावर चढून भिंतीच्या साहाय्याने वाड्यात घुसले. वाड्यात संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणी राहत होत्या. दरोडेखोरांनी सर्वात आधी संतोष आणि त्यांच्या बहिणीला मारहाण केली. बंदूक आणि त्यानंतर तलवारीच्या धाकावर कपाटातील रोख रक्कम आणि सोनं घेऊन पसार झाले. यात संतोष पांडे यांची बहीण करिष्मा पांडे, सविता तिवारी यांना जबर मारहाण करण्यात आली होती. प्रकरण गंभीर असल्याने यवतमाळ पोलिसांनी आपली सर्व ताकद या गुन्ह्यावर केंद्रित केली.

दरोडयाचा गंभीर प्रकार लक्षात घेता पोलीस अधिक्षकांनी सदरचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्यासाठी अनेक पथके नेमली होती. महागांव व उमरखेड परिसरात गुन्हे शाखेने पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके व पथकांनी आवश्यक तांत्रिक बाबी पडताळून आजुबाजुच्या गावात गोपनीय बातमीदार नेमले होते. अशा स्वरुपाचे गुन्हे करणारे अभिलेखावरील गुन्हेगार, सराईत गुन्हेगार यांची चाचपणी सुरू होती. परंतु पोलिसांना हाती काहीही लागत नव्हते. गुन्ह्याचे ठिकाण हे अतिशय दुर्गम परिसरात असल्याने तांत्रिक तपास करणे अतिशय अवघड झाले होते.
अशातच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला प्राप्त झालेल्या गोपनीय माहिती वरुन संशयीत आरोपी प्रविण विष्णु धोत्रे यांस गुन्हे शाखेने ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. तपासात आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल व गुन्हयातील नगदी असा एकुण 3,87,000 रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण शेळके याला गुन्हे शाखेने भिवंडी (मुंबई) येथुन आज (21 जून) ताब्यात घेतले आहे. इतर आरोपीतांना ताब्यात घेण्याकरीता तपास प्रक्रीया सुरू आहे. लवकरच उर्वरित आरोपींना अटक करून दरोड्यातील लुटलेला ऐवज जप्त करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड यांनी व्यक्त केला.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, हनुमंतराव गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वनारे, विवेक देशमुख, अमोल मुडे, गजानन गजभारे, धनराज हाके, शरद लोहकरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार, तसेच पोलीस स्टेशन महागांव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलीद सरकटे, राजु खाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार व पोलीस स्टेशन महागांव येथील पोलीस अंमलदार तसेच पोलीस स्टेशन उमरखेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.