>> यवतमाळ : प्रसाद नायगावकर
देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा केला जात असतांना ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा वानवा बघायला मिळतेय. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक येथील एका जेष्ठ नागरिकाचे ह्रदयविकाराने उपचारा दरम्यान निधन झाले. दरम्यान या ज्येष्ठ नागरिकाचे अंतविधी करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. या गावात पक्की बांधलेली स्मशानभूमीच नाहीय. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना बराच त्रास सहन करावा लागला. दरम्यान गावातील परंपरागत स्मशानभूमीत नदीचा पूर जात असल्याने नातेवाईकांना 10 किमी अंतरावर असलेल्या शेंबाळेश्वर देवस्थान येथे मृत व्यक्तीचे पार्थिव नेत त्यांच्यावर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागण्याची घटना समोर आली आहे.
पुसद तालुक्यातील गौळ बुद्रुक येथील जेष्ठ नागरिक पंजाबराव माधवराव देशमुख (70) यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ पुसद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावातील परंपरागत अंत्यविधीच्या ठिकाणी पैनगंगा नदीचा पूर वाहत होता. शिवाय गावात कुठली ही पक्की स्मशानभूमी नसल्याने ऐन पावसात अंत्यविधी करायचा कसा असा यक्ष प्रश्न गावकरी आणि नातेवाईकांना पडला. त्यांनतर नातेवाईकांनी गावापासून 10 किमी दूर असलेल्या शेंबाळेश्वर देवस्थानच्या परिसरातील स्मशानभूमीत पार्थिव नेत अंत्यविधी करावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.