>> प्रसाद नायगावकर
गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नागपूर-तुळजापूर हा महामार्ग बंद झाला आहे. तसेच विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या जिल्ह्यातील मार्लेगाव जवळील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्गही बंद केला आहे.
रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे कायधू नदीला पूर आलेला असून पुलाच्या वरतून पाणी वाहत आहे. अद्याप इसापूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि इसापूर धरणात पाण्याची आवक सुरुच राहिल्यास हे दरवाजे उघडावे लागतील. इसापूर धरणारे दरवाजे उघडल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
वारंगा महामार्गाची ‘वाट’ बिकट
मागील अनेक वर्षापासून नागपूर-तुळजापूरवरील महागाव ते वारंगा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामावर नेमलेल्या एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 4 वर्षात अनेकवेळा हे काम बंद पडले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तडे गेले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मार्लेगावाजवळील पूल हा एकेरी पद्धतीने सुरू आहे. मागील वर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कंत्राटदाराला चांगलीच तंबी दिली होती. पण अद्यापही हे काम अपूर्ण आहे. याचा हकनाक त्रास वाहनधारकांना तसेच प्रवाशांना होत आहे. त्यात कोसळणाऱ्या पावसाने या रस्त्याची पुरती वाट लावली आहे.