>> प्रसाद नायगावकर
मीटर रीडिंग घेण्यासाठी आलेल्यांनी चक्क वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला. ही घटना रंभाजी नगरात भर दुपारी घडली. या प्रकरणी प्रेमाबाई दुर्योधन बडोले (65) यांनी लोहारा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हे नोंद केले.
प्राप्त माहितीनुसार येथील रंभाजी नगरात प्रेमाबाई बडोले या वास्तव्य करतात. शुक्रवारी दुपारी दोन अनोळखी युवक मीटर रिडींगचा बहाणा करीत घरात आले. यातील एका युवकाने मिटरचा फोटो काढण्यास गेला. तर दुसऱ्या युवकाने त्या महिलेला पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी आणण्याकरिता जात असताना प्रेमाबाई बडोले यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. प्रसंगावधान साधून मोठ्या हिमतीने महिलेने एका हाताने चैन पकडून त्यांचा प्रतिकार केला. मात्र, जोरदार हिसका मारून हातात आलेली सोन्याची चैन घेऊन चोरट्यांनी घरातून पळ काढला. तेव्हा महिलेने आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळावरून पळ काढण्यात चोरट्यांना यश आले. शेवटी प्रेमाबाई दुर्योधन बडोले यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही अनोळखी चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. या भागातील सीसी टीव्ही फुटेज तपासून बघत आहेत. भरदुपारी जबरी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यामुळे घरी एकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षे संबंधी अधिक काळजी घेणे आवश्यक झाले आहे .