येडियुरप्पा राहणार की जाणार? आज फैसला

73
yediyurappa1

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी तब्बल १५ दिवसांचा अवधी दिल्याने खूश आणि निश्चिंत झालेले भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना आज दुपारी ४ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग याने केलेली ‘अणुचाचणी’ जगभर चर्चेचा विषय बनली होती, पण येडियुरप्पा यांची उद्याची बहुमताची चाचणी त्याहीपेक्षा अधिक चर्चेचा विषय बनली आहे. कारण या आधी बहुमताशिवाय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना २००७ सालात सातच दिवसांत पद गमवावे लागले होते. त्यामुळे आठ आमदारांची कमतरता असलेल्या येडियुरप्पांचे काय होणार याचीच चर्चा देशभरात रंगली आहे.

भाजपकडे बहुमत नसतानाही येडियुरप्पा यांना सरकार स्थापण्यासाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी भाजपची बाजू अॅड. मुकुल रोहतकी, तुषार मेहता यांनी तर काँग्रेसची बाजू अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम यांनी मांडली.

बहुमताची परीक्षा सभागृहात उद्या होऊ द्या आणि कायद्याप्रमाणे ‘प्रोटेम स्पीकर’ना काय तो निर्णय घेऊ द्या असे न्यायमूर्ती सिक्री यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देताना सांगितले. न्यायालयाच्या या निर्णयाला भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी विरोध केला. आमच्याकडे पुरेसा वेळ नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान आठवडाभराचा वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी केली. बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ एक दिवसाचा वेळ देणे योग्य नाही असे सांगतानाच बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देणे हा राज्यपालांचा विशेष अधिकार आहे. त्यात ढवळाढवळ करता येणार नाही असा युक्तिवाद रोहतकी यांनी केला, मात्र बहुमतासाठी अधिक वेळ देण्याची त्यांची विनंती न्यायालयाने धुडकावून लावली.

येडियुरप्पांना कशाच्या आधारे निमंत्रण दिले?
राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सरकार स्थापनण्यासाठी दिलेल्या निमंत्रणावर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. येडियुरप्पा यांना कशाच्या आधारे सरकार स्थापण्याचे निमंत्रण देण्यात आले, असा सवाल खंडपीठाने विचारला. काँग्रेस आणि जदसे हे पक्ष त्यांना आमदारांच्या असलेल्या पाठिंब्याचे पत्र दाखवत आहेत तर येडियुरप्पा हे त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे अंतिम निर्णय आता विधानसभेतच झाला पाहिजे असे सांगून खंडपीठ म्हणाले की, ज्यांना सरकार स्थापण्याचे निमंत्रण मिळाले त्यांनी उद्याच बहुमत सिद्ध करावे तर काँग्रेस-जदसे बहुमत सिद्ध करण्यास तयार आहे असे त्या पक्षाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले. आमच्याकडे बहुमतासाठी आमदारांची यादी आहे. त्यामुळे विश्वासमत ठरावावर लवकरात लवकर मतदान झाले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला.

चार शक्यता…
– निवडणुकीनंतर काँग्रेस-जेडीएस युती झाल्याने दोन्ही पक्षांतील काही आमदार नाराज आहेत आणि ते भाजपला मतदान करतील असा भाजपचा दावा आहे. बहुमत चाचणी जिंकण्यासाठी भाजपला या युतीमधील सात आमदार फोडावे लागणार आहेत. भाजपचा दावा खरा असेल तर हे सात आमदार मतदानावेळी गैरहजर राहू शकतात.

– काँग्रेस-जेडीएस युतीमधील १६ आमदारांनी राजीनामे दिले तर भाजपला बहुमत सिद्ध करण्यास फक्त १०३ मतांचीच गरज पडेल. त्यासाठी भाजप जोरदार घोडेबाजार करत असल्याचा काँग्रेस-जेडीएस युतीचा आरोप आहे. त्याच जोरावर ते पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत असल्याचेही या युतीने म्हणले आहे.

– पक्षाचा व्हिप झुगारून मतदान करणाऱया आमदारांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार निलंबन केले जाते. भाजपने विरोधकांचे आमदार फोडले तर त्या आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. असे १४ आमदार भाजपला फोडावे लागतील. तसे झाल्यास विधानसभेतील संख्याबळ २२१ वरून २०७ होईल आणि बहुमतासाठी लागणारा आकडाही खाली येईल.

– भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा हे बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा देऊ शकतात. यापूर्वी १९९६ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांनी १३ दिवसांमध्येच राजीनामा दिला होता. सध्या भाजप फोडाफोडीसाठी साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत आहे. मात्र त्यानंतरही बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले तर येडीयुरप्पा हे राजीनामा देतील अशी शक्यता आहे.

भाजपला दणका
– बहुमत सिद्ध करताना गुप्त मतदानाची येडियुरप्पा यांनी केलेली विनंतीही सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली
– उद्याच्या मतदानात सहभागी होण्यासाठी अँग्लो-इंडियन समाजातील कोणाचीही आमदार म्हणून नियुक्ती करता कामा नये असे आदेश न्यायालयाने राज्यपालांना आणि कर्नाटक सरकारला आज दिले.
– बहुमत सिद्ध होईपर्यंत कोणतेही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना न्यायालयाने मनाई केली.
– विधानसभेबाहेर कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात यावी असे आदेश कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना न्यायालयाने दिले.

आम्ही बहुमताचा आकडा लीलया पार करू. मला एकशे एक टक्के विश्वास आहे, आम्हीच जिंकणार. – येडियुरप्पा

भाजपचा खोटारडेपणा उघड झाला. सभागृहात नक्कीच आम्ही जिंकणार – राहुल गांधी

– कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांचा निकाल लागून भाजप १०४ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासाठी त्याला आठ जागांची कमतरता आहे. बहुमतासाठी ११२आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे तर काँग्रेस (७८) आणि जनता दल (सेक्युलर)-(३७) यांच्या आघाडीचे संख्याबळ ११५ इतके आहे.

बोपय्यांची नियुक्ती वादाच्या भोवऱयात; काँग्रेस सुप्रीम कोर्टात
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून के. जी. बोपय्या यांची केलेली नियुक्ती वादाच्या भोवऱयात सापडली आहे. काँग्रेस-जेडीएसने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी काँग्रेसच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. के. सिकरी यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी घेण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेतला. सकाळी साडेदहा वाजता ही सुनावणी होणार आहे. खंडपीठात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि अशोक भुशा यांचा समावेश आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी सायंकाळी 4 वाजता मतदान सुरू होणार आहे. तत्पूर्वीच ही सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मिश्रा यांनी दिले आहेत.

काँग्रेस-जेडीएसने अॅड. देवदत्त कुमार यांच्यामार्फत ही याचिका आज सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे दाखल केली. सुरुवातीला त्यात काही उणिवा होत्या. त्यानंतर दुरुस्त केल्या गेल्या. त्यानंतर रजिस्ट्रारने सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यासंदर्भात माहिती दिली. घटनेतील तरतुदीनुसार ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून सर्वात वरिष्ठ आमदाराची नियुक्ती केली जाते. राज्यपाल वाला यांनी बोपय्या यांच्यासारख्या कनिष्ठ आमदाराची नियुक्ती करणे घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

समान मते झाल्यास विधानसभा अध्यक्षही मतदान करू शकतात
येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या १०४ आमदार आहेत. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांवर निवडणुका झाल्या आहेत. दोन जागांवरील मतदान पुढे ढकण्यात आले आहे. जेडीएसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कुमारस्वामी हे दोन जागांवर निवडून आले आहेत. दोन्ही बाजूंनी समान मते झाली तर अशा अपवादात्मक स्थितीत विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार असतो.

आमदार विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न; ‘ऑडियो क्लिप’ आली
भाजप नेते जनार्दन रेड्डी यांनी काँग्रेसच्या एका आमदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यासंदर्भातील ऑडियो क्लिपही काँग्रेसने आज जाहीर केली. रायचूर ग्रामीण मतदारसंघातून विजयी झालेल्या काँग्रेस आमदाराला रेड्डी यांनी पैशांचे आमिष दाखवल्याचे या क्लिपमधील संभाषणातून स्पष्ट होते असा काँग्रेसचा दावा आहे. भाजपने मात्र ही क्लिप बनावट असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले.

येडियुरप्पांचे राज्यपालांना पत्र निकालाआधीच – सिंघवी
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांना पहिले पत्र १५ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता म्हणजे मतमोजणी पूर्ण होण्याच्या आधीच दिले होते असे काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले. आमदारांना निवडणूक आयोगाने प्रमाणपत्रे दिली नव्हती आणि अधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या हेसुद्धा स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे त्या पत्रात येडियुरप्पा हे बहुमताचा दावा करू शकले नव्हते असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या