भाजपच्या येडियुरप्पांनी दलिताच्या घरी खाल्ली हॉटेलातली इडली

सामना ऑनलाईन। कर्नाटक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांना दलिताच्या घरी जेवणे चांगलेच महागात पडले आहे. दलितांच्या घरी जेवायला गेले असता येडियुरप्पांनी घरचे पदार्थ न खाता हॉटेलमधून आणलेली इडली खाल्ली. असा आरोप दलित कुटुंबातील एकाने केला आहे. तसेच येडियुरप्पांचे हे वर्तन भेदभाव करण्याबरोबरच दलित समाजाचा अपमान करणारे आहे. असा आरोपही या व्यक्तिने केला असून पोलिसात तक्रार केली आहे.

येडियुरप्पा शुक्रवारी टूमकूर जिल्हयाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत एका दलित कुटुंबाला भेट दिली. येडियुरप्पा येणार असल्याने त्या घरातील महिलांनी हौसेने अनेक पदार्थ बनवले होते. पण ते अन्न न खाता येडियुरप्पांनी हॉटेलातून मागवलेली इडली खाल्ली. हे बघून तिथे उपस्थित असलेल्या दलितांना खुप वाईट वाटले. दलितांच्या घरातील अन्न असल्यानेच त्यांनी ते न खाता हॉटेलातली इडली खाल्ली असा आरोप त्या दलित कुटुंबातील एका सदस्य़ाने केला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली.

दरम्यान भाजपने हे सर्व आरोप फेटाळले असून येडियुरप्पांविरोधात तक्रार करणाऱ्याने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.