
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीतून वरोरा-माढेळी रोड मार्गे वणीपर्यंत शहरातून सुरू असलेली कोळशाची वाहतूक त्वरित थांबवण्यासंदर्भात आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता बनवण्यासंदर्भात दाखल याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एकोणा कोळसा खाण कंपनी प्रशासनाला नोटीस बजावली असून तीन आठवड्याच्या आत उत्तर मागितले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वातून वरोरा वासीयांतर्फे येथील सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई खेमराज कुरेकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेशसिंह गहलोत हे बाजू मांडत आहेत.
वरोरा तालुक्यातील वेकोलीची एकोणा खुली कोळसा खाण ही 3.44 दशलक्ष टन प्रति वार्षिक खाण आहे. खाण क्षेत्र हे वर्धा व्हॅली कोलफिल्डच्या पश्चिम मर्यादेच्या उत्तरेकडील विस्तार आहे आणि ते एकोना गावाला लागून आहे. सदर खाण ही 2020 मध्ये कार्यान्वित झाली. आणि ती कार्यान्वित झाल्यापासून एकोणा आणि खुल्या खाणीतून वणी मार्गे कोळशाच्या वाहतुकीसाठी जड वाहनांची सतत आवक आणि प्रवाह चालू आहे. वरोरा-माढेळी रोड व वरोरा-माढेळी रोडवर येणारी गावे यवतमाळ जिल्ह्यातील वणीकडे कोळसा वाहून नेणाऱ्या जड ओव्हरलोड वाहनांच्या प्रचंड आवकमुळे विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती.