‘या’ देशावर घोंघावतंय पाणीसाठा पूर्णपणे संपण्याचे संकट

आपल्यापैकी अनेकांनी येमेन देशाचे नाव ऐकले असेल. अरबी द्वीपकल्पाच्या (Arabian peninsula) दक्षिण-पश्चिमेस वसलेला हा देश. संपूर्ण अरबस्तानच खरेतर वैराण, रखरखीत, वाळवंटी. पाऊसपाणी नावालाच. सन’अ ही या देशाची राजधानी. तिच्या दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनारी एडन हे विख्यात शहर आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच शहरात कैद करून ठेवण्यात आले होते. त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता.

आज येमेनमध्ये परिस्थिती हलाखीची. 2015 पासून तेथे अंतर्गत यादवी माजली आहे (यादवी येमेनला काही नवी नाही). हौथी बंडखोरांनी देशाचा उत्तर-पश्चिम भाग व्यापला आहे. येमेनचे हादी सरकार सौदी अरेबियात पळून गेले असून सौदीच्या लष्कराने मात्र इतर मित्र-फौजांच्या मदतीने दक्षिण पूर्वेचा मोठा भूभाग ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी येमेन कुप्रसिद्ध आहे. कमालीचा भ्रष्टाचार, नागरिकांचा सरकारविरुद्ध कट करण्याच्या आरोपांवरून होणारा छळ, घरांवरील अंदाधुंद छापे, अटकसत्रे, तुरुंगातील कैद्यांना मिळणारी अमानवी वागणूक, खटल्यांशिवाय बंदिवास, समाजमाध्यमांवरील सरकारचे नियंत्रण व सरकाच्या विरोधी बोलण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, त्यांतून उद्भवणाऱ्या हत्या या सगळ्यांतून येमेन ढवळून निघाले आहे.

2015 पासून यादवीने तिथे कहर केला आहे. हौथी बंडखोर आणि सत्ताधारी हादी यांच्या समवेत सौदी अरेबिया युद्धात उतरला आहे. हादी सरकार सौदीत पळून गेले आहे. अनेक मित्रगट दोन्ही बाजूंना साथ देत आहेत. असंख्य नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. हजारो जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंचे कित्येक हजारोंपेक्षा अधिक सैनिक प्राणांस मुकले आहेत, अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स पाडण्यात आली आहेत. जवळजवळ 30 लक्षांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

हे सगळे कशासाठी? सत्तेवर बसण्यासाठी. अन्याय कोणावर होतो? सामान्य माणसावर. सत्तेत कोणीही का असेना? सामान्य माणसाचे प्रश्न थोड्याफार प्रमाणात तेच राहतात. मग हे सर्व कशासाठी? मूठभर लोकांच्या अंगातील खुमखुमीसाठी? त्यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी? जनसामान्यांचे हे अपरिमित नुकसान, त्यांची जीवितहानी व वित्तहानी कोण भरून काढणार? जगात आजतागायत युद्धाने कोणतेही प्रश्न सुटलेले नाहीत. उलट बळावलेत. इतिहासापासून राज्यकर्ते बोध कधी घेणार?

2016 पासून दुष्काळ आणि कॉलराची साथ यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ दुष्काळाच्या प्रादुर्भावामुळे 85,000 बालके मृत्युमुखी पडली आहेत. दिवसागणिक कॉलराच्या 5,000 नवीन घटना उघडकीस येत आहेत. युनिसेफने 2020 च्या मे महिन्यात प्रसृत केलेल्या एका निवेदनात ‘नजीकच्या काळातील मानवजातीवरील सर्वांत भीषण संकट’ अश्या शब्दांत या घटनेचे वर्णन केले आहे. त्यांच्या मते येमेनमधील 80% जनतेला (जवळजवळ 2.4 कोटी) कोणत्यानकोणत्या मानवतावादी मदतीची गरज आहे. यादवीच्या या काळात विविध गटांतील सत्तासंघर्षात येमेनमध्ये अनेक हवाई, खुष्कीच्या व समुद्री मार्गांची कोंडी झाली आहे. यामुळे दुष्काळ व कॉलरा अधिक तीव्रतेने जाणवतो आहे. अन्नधान्य, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा, औषधे, इतर वैद्यकीय सुविधा यांची प्रचंड प्रमाणात कमतरता जाणवते आहे. पाण्याचे दुर्भिक्ष इतके की लोक त्यांच्या कमाईच्या एक तृतीयांश भाग पाण्यावर खर्च करीत आहेत. जो काही पाऊस पडतो तो बादल्या, बाटल्या, पिंपे, खोलगट भांडी वगैरेंमध्ये साठवून दिवस ढकलले जात आहेत. जीवन (जगणे आणि पाणी) हे खऱ्या अर्थाने महाग झाले आहे. The times of London या वृत्तपत्राने ‘येमेन हे पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात येणारे जगातील पहिले राष्ट्र लवकरच बनू शकते’ असा धक्कादायक निष्कर्ष काढला आहे!

पाणी हेच जीवन

किती दुर्भाग्य! यादवी, एकमेकांचे गळे कापायला निघालेले सत्ताधीश, वाळवंटी हवामान, अनेक वर्षांपासून होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, डोक्यावर छप्पर नाही, भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा थांगपत्ता नाही, भूकबळी, बालमृत्यू, कॉलराची भीषण साथ, उद्ध्वस्त घरे, उद्ध्वस्त नगरे, हलाखीची आर्थिक परिस्थिती! नरक, नरक म्हणून म्हणतात तो यापेक्षा वेगळा तो काय?

या भयानक दुष्टचक्रातून येमेन कसा नि कधी बाहेर येणारे देव जाणे. आपण याबाबतीत फार काही करू शकतो असेही नाही. मात्र मरूस्थलातही ओएसीझ असतात. आपण निदान त्यांची वेदना समजून घेऊ शकतो. कोणी ओळखीचा निघाल्यास त्यास मानसिक आधार देऊ शकतो. असे अन्य कोणत्या देशाच्या बाबतीत होऊ नये अशी प्रार्थना करू शकतो व काळजी घेऊ शकतो. हे जग आशेवरच धावते आहे. म्हणतात ना,

आशा नाम मनुष्याणां काश्चिदाश्चर्यशृङ्खला |

यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ||

(आशा नावाची एक विलक्षण साखळी आहे. जे लोक या साखळीने बांधलेले असतात ते सगळीकडे धावाधाव करतात (म्हणजेच आशावादी लोक प्रयत्नशील असतात) पण जे या साखळीपासून मुक्त असतात ते जणू अपंगांसारखे पडून असतात (निराशावादी लोक प्रयत्नांची कास धरत नाहीत त्यामुळे ते ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी राहतात, त्यांची प्रगती होत नाही). त्यामुळे मनुष्याने कायम आशावादी असावे!)

येमेनमधील हे दुष्टचक्र लवकरच संपुष्टात येवो ही अगदी मनाच्या अथांग तळापासून सदिच्छा.

(सदर लेखाचे लेखक हे अनिरूद्ध जोशी असून त्यांनी  हा लेख Quora या प्रश्नोत्तरांच्या मंचावर प्रसिद्ध केला आहे)

 

आपली प्रतिक्रिया द्या