
हृदयात गाठ असलेल्या येमेनच्या 34 वर्षीय महिलेवर परळच्या ग्लोबल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेच्या हृदयात 6 सेमीची गाठ वाढली होती आणि त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र डॉक्टरांनी गुंतागुंतीची मिनिमल इनव्हेसिव्ह कार्डियाक शस्त्रक्रिया करुन महिलेला जीवदान दिले आहे
येमेन येथील रहिवासी अफिना (34) या महिलेस तीव्र श्वासोच्छवासाची गतीमुळे चालणे किंवा इतर शारीरीक क्रिया तसेच दैनंदिन कामांमध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर वैद्यकिय तपासणीत तिला जीवघेण्या कार्डियाक ट्यूमरचे निदान झाले. डॉक्टरांनी ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देखील दिला परंतु या शस्त्रक्रियेतील जोखीमेमुळे येमेनमधील कोणतेही डॉक्टर ही शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले नाहीत. शेवटी या महिलेने परळच्या ग्लोबल हॉस्पिटल्स येथे धाव घेतली.
परळच्या ग्लोबल रुग्णालयाचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी सांगतात की, सुरुवातील 2डी इकोने चाचणीद्वारे हृदयाच्या आत 6 सेमी लांबीचा मोठी गाठ आढळून आली. ही गाठ पाहता ओपन हार्ट सर्जरी करणे अत्यंत धोकादायक ठरले असते. त्यानंतर शस्त्रक्रियेचे आव्हान पेलत मिनिमली इनवेसिव्ह थोरॅक्टोमी हा मार्ग निवडण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यातून लवकर बरे होणे, कमीत कमी व्रण आणि गुंतागुंत टाळता येणे शक्य झाले. गाठीच्या आकारामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ही गाठ पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक होते कारण त्याचा काहीसा भाग देखील भविष्यात मोठी गुंतागुंत निर्माण करु शकतो. केवळ 8 सेमी चीर देऊन हा ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला.