येवला ग्रामीण रुग्णालयात सुविधांची वानवा

27

सामना प्रतिनिधी, येवला

येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सोयीसुविधांची मोठय़ा प्रमाणात वानवा आहे. या असुविधेमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असून त्यांना वारंवार विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयात स्वच्छतेची बोंब असल्याने साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असून या रुग्णालयांत किमान मूलभूत सुविधा तरी पुरवाव्यात अशी मागणी होत आहे. याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास आरटीआय क्रांतिकारी समितीने उपोषणाचा इशारा दिला आहे.

येवला ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात. त्यात विशेषतः भूलतज्ञ व बालतज्ञ डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांची दररोज तपासणी करण्यात यावी. साप व कुत्रे चावल्याच्या लस उपलब्ध करून द्याव्यात तसेच कित्येक दिवसांपासून मिळत नसलेले खोकल्याचे औषध उपलब्ध करून देण्यात यावे. स्वाईन फ्लू तसेच डेंग्यू आदी साथीच्या रोगांवर उपचारासाठी मुबलक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. अपघात विभागात चोवीस तास स्वतंत्र डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी धिरज परदेशी, दीपक काथवटे, लक्ष्मण कुमावत, संजय सोमासे, अशोक मोहारे, रशिद शेख, प्रशांत आरखडे, अ. वहाब फकीर मो., रियाज शेख, सुरेश गुजर, शफिक मो. साबीर, अश्पाक जाबीर, आसिफ शेख, मतिन शेख, दीपक सोनवणे, कालिदास अनावडे, शेरु मोमीन, रवींद्र तुपकरी, धर्मराज अलगट, काझी सलिम उपस्थित होते.

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
ग्रामीण रुग्णालयात असलेल्या असुविधांमुळे शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. सदर बाबत तत्काळ उपाययोजना करण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत आरटीआय क्रांतिकारी समिती येवला यांच्या वतीने १४ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या