समाजात भावी पिढी घडवत असताना या समाजाचे उत्तरदायित्व फेडण्याचे काम आजच्या महामारीत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी केले आहे. प्राथमिक शिक्षकांनी 6 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून 20 ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन बेडसह सहा लाखांचे आरोग्य साहित्य उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिले. शिक्षकांच्या या माणुसकीचे सर्वस्तरातून काैतुक होत आहे.

प्राथमिक शिक्षक गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटात शासकीय यंत्रणेला मदत करत आहेत. आपण अजून काहीतरी मदत करावी या हेतूने त्यांनी लोकवर्गणी काढण्याचा आणि आरोग्य साहित्य भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून केंद्रनिहाय प्रत्येक शिक्षकाने हजार ते दोन हजार रुपये मदत निधी देण्याचे ठरले. अल्पावधीत 500 च्या वर शिक्षकांच्या योगदानातून ही रक्कम जमा झाली. कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेकांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनयुक्त बेड देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांच्या टीमने नाशिक, सिन्नर, गुजरात, संभाजीनगर, नगर अशा असंख्य ठिकाणी शोधाशोध केली. अखेर नगर येथे सिलिंडर मिळाल्यावर आरोग्य साहित्य खरेदी करत त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, छगन भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, प्रांताधिकारी सोपान कासार, शिक्षक संघटना समन्वय समिती प्रतिनिधी उपस्थित होते.

सहा लाखांच्या मदतनिधीतून लोकार्पण

तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून जमा झालेल्या 6 लाख रुपये मदतनिधीतून उपजिल्हा रुग्णालय येथे तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णासांठी 20 ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर, 20 हायड्रोलीक बेड, गाद्या, बेडशीट, गरम पाण्याचे भांडे, वाफेचे मशीन हे साहित्य देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या