कुणी आहे का इथे? कार्यालय सोडून कर्मचारी पसार, पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर

77

सामना प्रतिनिधी, येवला

तालुक्यातील रहिवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त अशा मिनी मंत्रालयाची उभारणी करण्यात आली. येथे सुरू असणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयाचा मात्र मनमानी कारभार सुरू असल्याने या मंत्रालयाची नाव मोठे लक्षण खोटे अशी परिस्थिती झाली आहे. येथील कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसून कार्यालय सोडून कर्मचारी अधूनमधून पसार झाल्याचे उघड झाले आहे. पंचायत समितीतील अनेक कामे रखडलेली असताना ग्रामस्थांना या कार्यालयात कुणी आहे का इथे? असे विचारावे लागत आहे.

‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाप्रमाणे येथील कार्यालयाचे ८० टक्के दांडीबहाद्दर कर्मचारी याच कार्यालयाच्या शिपाई वाघ यांच्या भावाच्या लग्नाला थेट पुणतांबा फाटा कोपरगाव येथे गेले. दुपारी १ वाजल्यानंतर सर्व काम बुडवून कुठलीही अर्धपगारी रजा न टाकताच पंचायत समितीचे कार्यालय बेभरवशावर टाकून हे कर्मचारी पसार झाले. याबाबत दुघड यांनी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता ‘गेले असतील सर्व कर्मचारी दोन चार तासांसाठी, त्यात काय एवढं’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे अर्धा दिवस फक्त फॉर्म जमा करण्यासाठी लागला असल्याने व इतरही कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर देशमाने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप दुघड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे कार्यालयाच्या अनागोंदी कारभारासंबंधी ‘आपले सरकार पोर्टल’द्वारे तक्रार दाखल केली आहे. दुघड यांनी पंचायत समितीच्या कारभारावरच बोट ठेवत गटविकास अधिकारी यांचेसह सर्वच कर्माचाऱ्यांच्या कामावरती तक्रारी दाखल केल्या आहेत.

त्यामुळे कार्यालयात तालुक्याच्या विविध गावांतून आलेल्या लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनदेखील काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांचीही तक्रार करण्यात आली आहे.

टक्केवारीशिवाय कामच नाही
येथील कृषी विभाग, वित्त विभाग, पशुसंवर्धन विभाग, ‘इ’ व ‘द’ विभाग, रोजगार हमी अधिकारी यांच्याकडे कृती आराखड्यात मंजूर झालेल्या गावांतर्गत रस्ते, शिवार रस्ते, सामाजिक मंदिर, घरकुल, शौचालय, शेळी गोठा, गाय गोठा आदी कामांसंदर्भात फाईल जमा करण्यासाठी गेले असता पैसे घेतल्याशिवाय कामेच होत नसल्याचे म्हटले आहे, तर काही कामे ही एकूण मंजूर रकमेच्या टक्केवारीनुसारच घेतली जातात. जे पैसे देतील त्यांची कामे झटपट होतात आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांना नंतर या, वेळ नाही, साहेब आले नाहीत, रजेवर आहेत, पुढच्या आठवड्यात या फाईल सहीसाठी ठेवल्या आहेत, अशी कारणे देऊन घरचा रस्ता दाखविला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या