येवला पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे 3 सदस्य गैरहजर

1676

येवला पंचायत समिती सभापतीपदावर शिवसेनेचे प्रवीण गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. सभापती निवडीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिले, मात्र तालुक्याचे जेष्ठ नेते ऍड. माणिकराव शिंदे उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निघालेल्या या जागेसाठी शिवसेनेचे सदस्य प्रवीण गायकवाड हे एकमेव दावेदार होते. प्रथम अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापतीपदाची निवड होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल पाठविल्यानंतर पुन्हा अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागेचे आरक्षण निघाल्यानंतर शुक्रवारी सभापतीपदाची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रोहिदास वारुळे व गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यापूर्वी सकाळी 11 वाजता सभापतीपदासाठी शिवसेनेचे सदस्य प्रवीण गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकमेव अर्ज असल्याने सभापतीपदावर तहसीलदारांनी प्रवीण गायकवाड यांची अविरोध निवड जाहीर केली. यानंतर ऍड. माणिकराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली याच सभागृहात सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती रूपचंद भागवत यांनी आपल्या भाषणातून लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांचा आधारवड झाले पाहजे, सर्वसामान्य जनतेची कामे केली पाहिजे हे प्रवीण गायकवाड यांचे जीवनात सूत्र राहिल्याने आज त्यांची या पदावर निवड झाली. यावेळी माजी सभापती प्रकाश वाघ, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे, जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे, ग्रामसेवक रवींद्र शेलार, दीपक जगताप, राहुल लोणारी, डॉ. सुरेश कांबळे, खंडू बहिरम यांची गौरवपर भाषणे झाली. यावेळी माजी सभापती संभाजी पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, उपसभापती लक्ष्मीबाई गरुड, ऍड. मंगेश भगत, पंचायत समिती सदस्य आशा साळवे, सुवर्णा जगताप, कविता आठशेरे, छगन आहेर, शरद लहरे, कांतीलाल साळवे, विठ्ठल आठशेरे, डॉ. सतीश कुर्हे, दीपक भदाणे, नवनाथ खोडके, विठ्ठल पिंपळे, चंद्रकांत साबरे, विजय भोरकडे, बाळासाहेब दाणे, रावसाहेब भागवत, संजय सालमुठे, किरण ठाकरे, अरुण मोरे, अरविंद पवार, राजेंद्र पवार, राजेंद्र मोरे, पुंजाराम मोरे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण काळे यांनी केले तर चद्रकांत शिंदे यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या