ग्राहकांमध्ये घबराट; येस बँकेच्या एटीएमसमोर मध्यरात्रीच रांगा

502

व्यवस्थापनाचा गलथान कारभार, अनिर्बंध कर्जवाटपामुळे येस बँक आर्थिक अडचणीत आली आणि निर्बंध लावण्यात आले. येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. या निर्बंधामुळे बँकेचे ग्राहक हादरले असून, घबराट पसरली आहे. गुरुवारी मध्यरात्री देशभरातील येस बँकेच्या एटीएमपुढे ग्राहकांच्या रांगा लागल्या.

अनेक बडय़ा कर्जदारांनी दिवाळखोरी जाहीर केल्याने येस बँक अडचणीत आली. बँकेचा ताळेबंद सक्षम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वतीने सतत चर्चा सुरू होती. पण येस बँकेला खासगी इक्विटीमार्फत भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले. हे वृत्त प्रसारीत होताच येस बँकेचे ग्राहक हादरले. आपले पैसे काढण्यासाठी मुंबई, पुणे, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये येस बँकेच्या ‘एटीएम’कडे ग्राहकांनी धाव घेतली. मध्यरात्रीपर्यंत रांगा होत्या. अनेक एटीएममध्ये खडखडाट झाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. पै पै जमवून केलेली अनेकांची गुंतवणूक अडकली आहे.

घाबरू नका; खातेदारांचे पैसे सुरक्षित

येस बँकेच्या खातेदारांनी घाबरू नये. सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. स्टेट बँकेने (एसबीआय) येस बँक खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. स्टेट बँक पुढील तीन वर्षांपर्यंत 49 टक्के आपली गुंतवणूक ठेवू शकते. येस बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर स्टेट बँकेकडून येस बँक ताब्यात येईल असे त्या म्हणाल्या. येस बँक डबघाईला का गेली? कोणाला नियमबाहय़ पद्धतीने कर्ज वाटप केले? याची चौकशी रिझर्व्ह बँक करणार आहे. तसेच येस बँकेतील कर्मचाऱयांची नोकरी आणि त्यांचा पगार एक वर्ष सुरक्षित असेल असे सीतारामन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या