Yes Bank crisis: महापालिकेचे 70 कोटी, स्मार्ट सिटीचे 14 कोटी अडकले

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध लादल्याने येस बँकेच्या खातेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या हजारो खातेदारांनी शुक्रवारी या बँकेत मोठी गर्दी केली होती. नाशिक महापालिकेचे 70 कोटी रुपये, तर नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कंपनीचे या बँकेमध्ये 14 कोटी रुपये अडकल्याने विकासकामांवर त्याचा परिणाम होणार आहे. आर्थिक परिस्थिती खालावल्याने रिझर्व्ह बँकेने गुरुवारी येस बँकेवर निर्बंध आणले. यामुळे खातेदारांना पन्नास हजाराहून अधिकची रक्कम काढता येणार नाही. या बँकेत नाशिकमधील हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे पैसे कसे परत मिळतील, या चिंतेने कॉलेज रोडवरील येस बँकेच्या शाखेत खातेदारांनी आज सकाळपासून गर्दी केली होती. नाशिक महापालिकेचे विविध करासह इतर महसूलाचे एकूण 202 खाते येस बँकेत आहेत, या बँकेत सुमारे 70 कोटी रुपये अडकले आहेत. शुक्रवारपासूनच या बँकेतील महापालिकेचे व्यवहार बंद करून स्टेट बँक ऑफ इंडियात सुरू करण्यात आले आहेत. यापुढे कर व महसुलाची रक्कम स्टेट बँकेत
जमा होणार आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कं पनीचे येस बँकेत कार्यालयीन खर्चाचे खाते असून, त्यात 14 कोटी रुपये अडकल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी दिली. या बँकेत 5 जानेवारी 2019 पर्यंत स्मार्ट सिटी कंपनीच्या 50 कोटी रुपयांच्या मुदतठेवी होत्या. प्रोजेक्ट अकाऊंटमध्ये 151 कोटी 65 लाख रुपये होते. बँक निधी खात्यातही कोट्यवधी रुपये होते, असा दावा गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. याबाबत कंपनीने जाहीर खुलासा करून तपशील नाशिककरांसमोर आणावा. बँकेत खाते उघडण्याआधी बोर्ड मिटींग झाली होती का, त्याबाबत ठराव झाला होता का, तो झाला असल्यास सूचक, अनुमोदकांची नावे जाहीर करावी, सरकारी बँकांचा पर्याय उपलब्ध असताना खासगी बँकेचा म्हणजेच येस बँकेचा पर्याय का निवडला याची चौकशी व्हावी आदी मागण्या जानी यांनी केल्या आहेत.

दरम्यान, कं पनीचे फक्त कार्यालयीन खर्चाचेच खाते सध्या येस बँकेत असून, त्यावर 14 कोटी रुपये आहेत. इतर सर्व खाते हे मागील वर्षीच बंद करून ते इतर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत, असे थवील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या