येस बँकेत नियमबाह्य पैसे गुंतवल्यास कारवाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

1252

आर्थिक अनियमिततेमुळे देशातील लाखो ग्राहकांना संकटात लोटणाऱ्या येस बँकेत राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि विविध महामंडळांनी किती रकमा गुंतवल्या आणि त्यांची किती खाती आहेत याची माहिती घेतली जाईल. तसेच नियमाच्या बाहेर जाऊन ज्या बँका, संस्थांनी पैसे गुंतवणूक करून घेतले आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना दिला.

येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर त्यामध्ये नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य महापालिकांच्या ठेवी अडकल्यासंदर्भात विधान परिषदेत नियम 97 अन्वये आमदार हेमंत टकले यांनी ही अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. नाशिक महापालिकेचे 311 कोटी रुपये आणि प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी आदी योजनांचे केंद्राकडून आलेले नाशिक महापालिकेचे 176 कोटी रुपये येस बँकेत अडकले आहेत. त्यासोबतच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हजारहून अधिक कोटींच्या ठेवी अडकल्या असल्याचा मुद्दा या चर्चेच्या माध्यामातून उपस्थित झाला.

चर्चेला उत्तर देताना मंत्री शिंदे म्हणाले, नाशिक महापालिकेचे 14.78 कोटी अजूनही पैसे या बँकेत शिल्लक आहेत. हा सर्व जनतेचा पैसा आहे. तो बुडता कामा नये. यासाठी जे जे उपाय करावे लागतील ते ते करू. लवकरच अर्थमंत्री व सहकारमंत्र्यांसोबत बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी बँका यांच्याकडून आढावा घेतला जाईल. तसेच काही बँका, पतसंस्था व इतर संस्थांनी अधिक व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे गुंतवणूक करून घेतले आहेत याचा आढावा घेतला जाईल. तसेच सामान्यांची फसवणूक होणार नाही यासाठी सरकारतर्फे ठोस उपाययोजना केल्या जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, येस बँकेतील खातेदार, गुंतवणूकदारांवर मोठे संकट आले आहे. येस बँकेसारख्या वित्तीय संस्थाच्या माध्यमातून एखादा आर्थिक गैरव्यहार होतो त्याची गृहखात्यांतर्गत चौकशी होते. राज्यातील महापालिका, महामंडळे यांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. यापुढे अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार झाल्यास कडक कारवाई केली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या