बॉलीवूड अभिनेत्रीच्या वडिलांचे YES बँकेत अडकलेत 2 कोटी रुपये, वडील कॅन्सरचे रुग्ण असल्याची माहिती

1388

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी संध्याकाळी YES bank च्या ग्राहकांना हादरवणारी बातमी दिली. या बँकेवर निर्बंध घालण्यात आले असून खातेधारकांना खात्यातून फक्त 50 हजार रुपयेच काढण्याची मुभा देण्यात आली आहे. या बातमीमुळे खातेदार धास्तावले असून त्यांनी पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत. यामध्ये महिला, वृद्धांचाही समावेश असून ते रडकुंडीला आले आहेत. या ग्राहकांमध्ये हिंदी अभिनेत्रीच्या वडिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर प्रचंड सक्रीय असलेल्या आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या पायल रोहतगीने एका खासगी वृत्तवाहिनीला तिच्या वडिलांचेही या बँकेमध्ये पैसे असल्याचं सांगितलं. शशांक रोहतगी असं तिच्या वडिलांचे नाव असून या बँकेमध्ये त्यांचे 2 कोटी रुपये अडकलेले आहेत. अहमदाबादच्या सुभाष चौकातील येस बँकच्या शाखेत त्यांचे खाते आहे. पायलने सांगितले की 11 वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी या बँकेत खाते उघडले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी अहमदाबादमधल्या शाखेमध्ये आपली रक्कम वळवली होती. सेवानिवृत्त असलेले शशांक रोहतगी हे कॅन्सरशी आणि अन्य आजारांशी झुंज देत असल्याचंही पायलने सांगितलं आहे. येस बँकेसंदर्भातील बातमी ऐकून त्यांनाही धक्का बसला असल्याचं पायलने सांगितलं आहे.

शशांक रोहतगी यांनी गुरुवारी सगळे पैसे दुसऱ्या बँकेत ठेवण्याचा निर्णय गेतला होता. त्यांनी यासंदर्भात बँकेशी संपर्क साधला होता. बँके अधिकाऱ्यांनी त्यांना संपूर्ण रकमेचा धनादेश शुक्रवारी देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र चेक मिळायच्या आधीच बँकेवर निर्बंध आल्याची बातमी आली आणि शशांक यांना मोठा धक्का बसला.

गेलं वर्षभर शशांक रोहतगी हे बँकेची आर्थिक अवस्था नीट नसल्याचे वृत्त पाहात होते. यामुळेच त्यांनी बँक बदलण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा-जेव्हा त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सगळं काही आलबेल असल्याचं सांगत त्यांना विचार बदलायला लावला होता. यामुळेच त्यांनी या बँकेतील खातं बंद करण्याचा विचार आतापर्यंत पुढे ढकलला होता. गुरुवारी त्यांनी खातं बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र तोपर्यंत निर्बंध लादण्यात आले होते.

येस बॅँकेने दिलेल्या कर्जांची वेळेवर परतफेड झालेली नाही. बहुतांश कर्जे बुडीत गेली आहेत. बँकेची पत घसरल्याने रिझर्व्ह बँकेला आर्थिक निर्बंध घालावे लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध राहतील असे सांगत रिझर्व्ह बँकेने खातेदारांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, एसबीआयने हिस्सेदारी खरेदी केल्यास येस बँकेला बराच आधार मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या