शब्द… संगीत… भावनांचा रहस्यमय खेळ – ‘येस माय डियर’

  • क्षितिज झारापकर

‘देअर इज नथिंग लाइक सायलेन्स इन थिएटर’ हे विधान मराठी रंगभूमीच्या एका श्रद्धास्थान असलेल्या दिग्दर्शन स्थळाचं आहे. नाटकात निःशब्द शांतता संभवत नाही. विधान तसं विचारमग्न करणारं आहे. कारण ‘सायलेन्स स्पीक्स लाऊडर दॅन वर्डस्’ हे मान्य करून चालण्याची सवय आपल्याला अजाणतेपणी लागून जाते. हल्लीचे नाट्यकर्मी मात्र पहिलं विधान ग्राह्य धरून प्रेक्षकांवर वाक्यांचा भडिमार करून त्यांना अक्षरशः शब्दबंबाळ करताना आढळतात. शाब्दिक कोट्यांच्या पंचेसवर तर हल्लीची नाटकं जगताना दिसतात. खरं तर वरील दोन्ही वाक्ये अजिबात परस्परविरोधी नाहीत. ‘सायलेन्स’चा शांतता हा एक अर्थ झाला, पण बोलताना सायलेन्स म्हणजे शब्दहीनता हाही एक अर्थ होतो. इथे तो अभिप्रेत आहे. शब्दांव्यतिरिक्त नाट्यकलेच्या इतर अंगांचा वापर करून एखादा प्रसंग जास्त परिणामकारक करता येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच जणू काही नाट्यमंदार या संस्थेच्या मंदार शिंदे या तरुण निर्मात्याने ‘येस माय डियर’ हे नवीन कोरं नाटक नुकतंच रंगभूमीवर आणलंय.

‘येस माय डियर’ या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्रीनिवास नार्वेकर. हे नाव रंगकर्मींना नवीन नाही. प्रेक्षकांच्या दृष्टीने ‘येस माय डियर’ हे त्यांचं पहिलंच व्यावसायिक नाटक. गेली कित्येक वर्षे श्रीनिवास नार्वेकर हे महाराष्ट्रभरात हौशी रंगकर्मींकरिता एक आदराचं व्यक्तिमत्त्व आहे. राज्यस्तरावर त्यांचं हे नाट्य आणि साहित्याच्या क्षेत्रातलं कार्य उदंड आहे. नाट्य प्रशिक्षण शिबिरातून जेव्हा श्रीनिवास नाटकातले पॉझेस म्हणजेच स्वल्पविराम, पूर्णविराम आणि दीर्घविराम शिकवतो तेव्हा त्याचा उपयोग तो व्यावसायिक नाटकात कसा करील ही ‘येस माय डियर’ या नाटकाविषयीची पहिली उत्सुकता होती. दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकरांनी इथे त्यांची समज पूर्णपणे दाखवली. त्यांच्या स्तब्धता आणि निःशब्दतेच्या नेमक्या हाताळणीमुळे या नाटकाला एक वेगळा ताजेपणा लाभलाय. एकंदरीतच त्यांनी या नाटकाचं दिग्दर्शन हे वरवर सोपं ठेवत नाटकाच्या सब्जेक्टला बाहेर आणण्यासाठी अबोलक्या जागांचा वापर केला आहे. हे खूपच जड झाले. ‘येस माय डियर’ हे नाटक एक सस्पेन्स ड्रामा आहे. त्यामुळे त्याच्या कथानकाची चर्चा इथे संभवत नाही, पण कौटुंबिक स्तरावर जेव्हा सस्पेन्स उभा करायचा असतो तेव्हा बऱ्याच स्तरांवर पात्रांमधले संबंध उभे करावे लागतात. इथे शब्दांची नाही, तर भावनांशी खेळायचं असतं. नार्वेकरांनी हे छान साधलंय.

‘येस माय डियर’ या नाटकाचा फेशनेस केवळ एवढ्यावर नाही. नाटकाचे संगीतकार कौशल इनामदारही काही काळाने नाटकाच्या पार्श्वसंगीताकडे वळले आहेत. ‘येस माय डियर’मधल्या शब्दहीन जागा भरून काढण्यात त्यांचा हातभार मोठा आहे. बाबा पार्सेकरांचं नेपथ्यदेखील साजेसं आहे. तांत्रिक बाबींमध्ये नाटक कुठेही कमी पडत नाही. या बाबी कथानकाला आणि दिग्दर्शनाला पूर्णपणे सप्लीमेन्ट करतात.

कोणतंही सस्पेन्स नाटक हे खऱ्या अर्थाने उभं राहतं ते कलाकारांच्या भांडवलावर. मंदार शिंदे आणि श्रीनिवास नार्वेकर यांनी इथेही ‘येस माय डियर’चा ताजेपणा जपला आहे. नाटकातली एकमेव स्त्री कलाकार सुमुखी पेंडसे आहे. नेहमीच्या ‘युजुअल सस्पेक्टस्’चा अतिपरिचित अभिनय पुन्हा अनुभवण्यापेक्षा सुमुखीचा अभिनय ‘येस माय डियर’ला एक वेगळेपणा प्रदान करतो. यातली सनिया निहार ही आपल्याला आधीपासूनच कोणतेही आडाखे बांधू देत नाही आणि ही गोष्ट नाटकाची गूढता जपण्यात कामी येते. सुमुखीकरिता ही भूमिका म्हणजे टेलरमेड आहे. कोणत्याही कलाकाराला पुनरागमन करण्यासाठी एक वैविध्यपूर्ण भूमिका हवी असते. सनिया निहार ही अशीच भूमिका आहे. या पात्राला ‘येस माय डियर’ नाटकात अनेक छटा आहेत. शिवाय नाटकाच्या सुरुवातीपासून अंतापर्यंत आपल्याला सनिया निहारचा ठावच लागत नाही. हा लेखक आणि सुमुखी दोघांचा विजय आहे. समीर दळवी या तरुण नवीन नटाने सनियाच्या नवऱ्याची, निहार विश्वासची भूमिका साकारली आहे. निहारचा प्रत्येक बाबतीतला त्रागा समीरने व्यवस्थित सादर केलाय. या दोघांमुळे नाटकाच्या अभिनय डिपार्टमेन्टमध्ये हवा तो ताजेपणा पाहायला मिळतो.

रोहन पेडणेकर या अॅमॅच्युअर नाट्यकर्मीने फेसबुकवर परवाच एक विधान केलंय. ‘जी पुरवली आणि भागवली जाते तिला गरज म्हणतात आणि जी पुरवूनही भागत नाही तिला खाज म्हणतात.’ व्यावसायिक नाटकाला ओळखीच्या चेहऱ्यांची गरज असते. ही गरज इथे विजय मिश्रासारख्या गुणी कलाकाराच्या माध्यमातून पुरवली आणि भागवली जाते. विजय एक हरहुन्नरी कलाकार आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पुनरागमनाच्या नाटकातून ‘सर आले धावून’मधून तो उदयाला आला. त्यानंतर बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलंय. विजय मिश्रा याने लोकनाट्यदेखील केलेली आहेत. एवढा डायव्हर्स बायडेटा असणारा हा व्हर्सटाईल नट आहे. ‘येस माय डियर’मध्ये तो विश्वनाथ अवस्थी हे सर्वात महत्त्वाचं पात्र साकारतो. एक अत्यंत रुथलेस बिझनेसमनचं हे पात्र विजय खूपच सिन्सियरली करतो. उत्तरोत्तर नाटकात या भूमिकेचे पोत उलगडत जातात आणि विजय मिश्रा ‘येस माय डियर’चा पूर्णपणे ताबा घेतो.

कोणतंही नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यामागची एखाद्या निर्मात्याची भूमिका महत्त्वाची असते. मंदार शिंदे या तरुण निर्मात्याने ‘येस माय डियर’ हे नाटक एक निखळ करमणूकप्रधान नाटक म्हणून करायचं ठरवलेलं दिसतं. नाट्यप्रेमींची करमणूक ही केवळ विनोदी नाटकांमधूनच होते अशी विनोदी समजूत करून न घेता एक रहस्यमय आणि उत्तम अभिनित नाटकदेखील आपलं मनोरंजन करू शकतं यासाठी ‘येस माय डियर’ हे नाटक पाहायला हवं.

l दर्जा : अडीच स्टार
l नाटक : Yes माय डिअर
l निर्मिती : नाट्यमंदिर
l निर्माते : मंदार शिंदे
l लेखक : श्रीनिवास नार्वेकर
l दिग्दर्शक : श्रीनिवास नार्वेकर
l नेपथ्य :  बाबा पार्सेकर
l संगीत : कौशल इनामदार
l कलाकार : सुमुखी पेंडसे, समीर दळवी, मंदार शिंदे
kshitijzarapkar@yahoo.com