हनी सिंगविरोधात पत्नीची पोलिसांत तक्रार, लैंगिक हिंसाचार आणि कौटुंबिक छळाचा आरोप

बॉलिवूड व पंजाब चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक योयो हनी सिंग उर्फ हिरदेश सिंग याच्या विरोधात त्याची पत्नी शालीनी तलवार हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. शालीनीने दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारी तानिया सिंग यांच्या कडे ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शालिनीने घरगुती हिंसाचार, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार व आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.

शालिनी यांची तक्रारीची याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून या प्रकरणी हनी सिंगला उत्तर देण्यास 28 ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिला आहे. तसेच न्यायालयाने हनी सिंगला दोघांच्या एकत्रित असलेल्या प्रॉपर्टी न विकण्याचे आदेश दिले आहेत. ‘ 2014 साली जेव्हा हनी सिंग व माझ्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले त्यावेळी ते फोटो लिक झाले म्हणून त्याने ंमला खूप मारले होते. त्यानंतर नाईलाजाने त्याला मला जगासमोर आणावं लागलं. तो आमच्या दोघांच्या नावावर असलेली संपत्ती देखील त्याला वाटेल तेव्हा विकतो’, असा आरोप शालीनीने केला आहे.

योयो हनी सिंगने 2011 साली कॉकटेल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. योयो हनी सिंग हा त्याच्या पार्टी साँगसाठी ओळखला जातो. हनी सिंग याने 2014 पर्यंत एका रिअॅलिटीशोमध्ये त्याच्या पत्नीला आणत सर्व चाहत्यांना धक्का दिला होता. त्या रिअॅलिटी शो नंतर तो विवाहीत आहे हे सर्वांना समजले होते.

आपली प्रतिक्रिया द्या