योगा, दरोडा आणि उपोषण

44

आशीष बनसोडे

[email protected]

लोकं तशी वृत्ती. प्रत्येकाची स्टाईल, राहणीमान आणि कामाची पद्धत वेगवेगळी असते. मग याला गुन्हेगार तरी कसे अपवाद असतील. मुंबई क्राइम ब्रॅचच्या प्रॉपर्टी सेलने एका दरोडय़ाच्या गुह्यात तीन जणांची टोळी जेरबंद केली. हे तिन्ही आरोपी तसे सराईत गुन्हेगार. पण त्यातल्या एकाची कार्यपद्धती भलतीच हट के आहे.

दिंडोशी येथे एका दुकानाचे शटर उचकटून १०९ मोबाईल चोरल्याच्या गुह्यात प्रॉपर्टी सेलने नारायण तेवर ऊर्फ मुरगन, गणपत चावडा आणि भरत कोळी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुरगन हा टोळीचा म्होरक्या. त्याचा राहण्याचा पत्ता नाही. कधी इथे तर कधी भलतीकडे अशी जागा बदल तो राहतो. त्यामुळे सहजासहजी पोलिसांच्या हाती तो लागत नाही. पण प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर, एपीआय सुनील माने, चंद्रकांत दळवी, लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने तसेच अनिल सोनवणे, सुनील कांगणे, चंद्रकांत वलेकर, आनंद गेंगे आदींच्या पथकाने दिंडोशीच्या गुह्यात कसून तपास करीत मुरगन आणि त्याच्या साथीदारांना पकडलेच. या तिघांची ओळख आर्थर रोड तुरुंगात झाली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या तिघांनी टोळी बनवली आणि दरोडे टाकायला सुरुवात केली. तिघेही तसे बिनधास्त. पण गणपत आणि भरतच्या तुलनेत मुरगन भलताच वेगळा गुन्हेगार आहे. पन्नाशी गाठलेल्या मुरगनने आतापर्यंत २५ हून अधिक घरफोडीचे गुन्हे केले आहेत. मुरगनचे वैशिष्ट म्हणजे तो कुठलेही व्यसन करीत नाही. त्याचे लग्नदेखील झालेले नाही. तो नियमित व्यायाम आणि योगा करतो.  डायटवर त्याचा विषेश भर असतो. त्यामुळे त्याची शरीरयष्टी बलदंड आहे. ताकदीच्या जोरावर तो बंद शटर लिलया उचकटतो. कोणी पकडायला आलेच तर चार-पाच जणांना तो भारी पडतो. फक्त लुटलेल्या पैशांवर मौजमजा करायची, उंची कपडे घालायचे याचा मुरगनला शौक आहे. मुरगनची ही एक बाजू झाली. पण पोलिसांच्या हाती लागलाच तर तो वेगळे रूप धारण करतो. पोलिसांनी पकडल्यानंतर मुरगन उपोषणाचे हत्यार उपसतो. कोठडीत गेला की तो खाणे-पिणे बंद करतो. यामागे पोलिसांवर वेगळ्या पद्धतीने दबाव आणण्याची त्याची मोडस ऑपरेंडी असते. न खाल्यामुळे तब्येत ढासळलीच तर हॉस्पिटलमध्ये आराम करायला मिळते. शिवाय असे केल्यावर पुन्हा पोलीस आपल्या नादाला लागणार नाही अशी त्याची शाळा असते. एकंदरीतच व्यायाम, योगा, चोऱया आणि उपोषण हे तंत्र घेऊन जगणारा मुरगन हा भलताच चोरटा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या