
>> सीए अभिजित कुळकर्णी
उज्जायी हा आंतर पुंभक प्राणायामातील अत्यंत महत्त्वाचा प्राणायाम. उज्जायी प्राणायाम नीट समजला तर इतर प्राणायाम सहजपणे जमू शकतात. या प्राणायामात श्वासोच्छ्वास अत्यंत सावकाशपणे करायचा असतो. श्वासोच्छ्वासाची गती इतकी कमी अथवा संथ असते की, एका मिनिटात केवळ एक किंवा दोन वेळा श्वसन केले जाते. (सामान्यतः मनुष्याच्या श्वसनाची गती ही मिनिटाला 15 ते 18 श्वास इतकी असते.)
उज्जायीचे लाभ
खऱया अर्थाने दीर्घ श्वसन झाल्याने आपल्याला प्राणवायू अधिक प्रमाणात मिळतो.
श्वासनलिका आपुंचित केल्याने हवेचे घर्षण अधिक होते आणि हवा अधिक शुद्ध होऊन आपल्या फुप्फुसांपर्यंत पोहोचते.
गळय़ामध्ये लाळ ग्रंथी आणि थायरॉइड ग्लाइंग्स असतात त्यांना व्यायाम मिळून त्यांची कार्यक्षमता सुधारते.
झोप चांगली येते. मनाचा तणाव दूर होऊन रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित होतात
मन शांत होते. श्वसनावर आपले बऱयापैकी नियंत्रण येते.
फुप्फुसाची क्षमता वाढते. योग्य प्रकारे श्वसन करण्याची सवय लागते.
उज्जायीवर फार मर्यादा नाहीत जेवणानंतर आणि जेवणापूर्वी उपाशी पोटी व भरल्या पोटी बसून व उभे राहूनही उज्जायीचा अभ्यास करता येतो.
श्वसनसंस्था
श्वसनसंस्थेतील बहुतांश अवयवांवर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही, पण दोन ठिकाणी मात्र आपण काहीतरी प्रभाव निश्चित टाकू शकतो. आपण आपल्या नाकपुडय़ा काहीवेळा बंद करून ठेवू शकतो. दुसरा नियंत्रण बिंदू म्हणजे गळय़ातील पंठमणी. गळय़ाचे स्नायू थोडे ताठर करून आतल्या बाजूला खेचून धरले, गळा आपुंचित केला तर पंठमणी श्वासनलिकेवर दाबला जातो. त्यामुळे आधीच लहान व्यासाची असलेली श्वासनलिका ही आणखी आपुंचित होते.
पहिली पायरी – पंठमणी
सर्वप्रथम गळा आत खेचून ठेवावा. गळय़ाचे स्नायू थोडे ताठर करावेत. श्वासनलिका अधिक आपुंचित झाल्याने तिथे हवेचे घर्षण अधिक प्रमाणात होते. श्वासोच्छ्वासाला अवरोध झाल्याने त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. श्वासोच्छ्वासाला नियंत्रण करायची ही किल्ली म्हणूनच आपल्या गळय़ात असते असे म्हटले जाते.
दुसरी पायरी – ध्वनीसहित श्वसन
उज्जायी या शब्दाचा अर्थच आहे ध्वनीयुक्त श्वसन! श्वासनलिकेत हवेचे घर्षण अधिक होत असल्याने तेथे श्वासोच्छ्वासाचा ध्वनी अधिक सुस्पष्ट ऐकू येतो. हा ध्वनी सहज असावा. आपल्याला ऐकू येईल इतका स्पष्ट असावा. ध्वनी केवळ श्वासोच्छ्वासाचा असावा.
तिसरी पायरी – श्वासोच्छ्वासाचे प्रमाण
श्वास आणि उच्छ्वास पूरक आणि रेचक यांचे प्रमाण हे 1ः2 इतके असावे. हे प्रमाण साधण्यासाठी साधकाकडे अनेक पर्याय असतात. आपण वेळ लावू शकतो किंवा मनात अंक मोजू शकतो, पण आपल्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे हे प्रमाण साधण्यासाठी आपण एखाद्या मंत्राचा आधार घ्यावा.
चौथी पायरी – प्राणधारणा
गळय़ावर नियंत्रण, ध्वनीयुक्त श्वसन आणि श्वसनाचे प्रमाण साधताना आपले मन हे आपण श्वासोच्छ्वासावरती एकाग्र करावे. हवेचा स्पर्श आपल्या नाकपुडय़ांत आणि श्वासनलिकेत अनुभवावा. उज्जायी ही पुंभकासहही केली जाऊ शकते. पुंभक करत असू तर त्यासोबत जालंधरबंध, मूलबंधही करावे.