यूपीत 15 मिनिटांना एक बलात्कार; गुंतवणूक होणार कशी?

उत्तर प्रदेश हा हत्यांचा प्रदेश झाला आहे. सत्य लिहिणाऱया पत्रकारांना तुरुंगात डांबले जाते. इथे दर 15 मिनिटांना एक बलात्कार होतो. दरोडेखोरांना मोकाट रान आहे. इथली कायदा-सुव्यवस्था सरकार सांभाळू शकत नसेल तर इथे गुंतवणूक होणार तरी कशी, असा सवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला.
उत्तर प्रदेशचा माथा गुन्हेगारांसमोर नतमस्तक झाला आहे आणि योगी आदित्यनाथ मुंबईत जाऊन उद्योजकांसमोर शरणम् गच्छामि करीत असतील तर यासारखी लोकशाहीची दुसरी थट्टाच असू शकत नाही, अशी जहरी टीका अखिलेश यादव यांनी केली. भाजपच्या राज्यात इथल्या माता-भगिनी सुरक्षित नाहीत. दररोज त्यांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे. अशा अपराध्यांना आळा घालण्याऐवजी इथल्या मुख्यमंत्र्यांना कुणाचे लग्न कुणासोबत होत आहे, यातच अधिक रस आहे.

कन्नोज येथे 15 वर्षीय युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. गेट नोएडातील एका गावात चार गुंडांनी एका मातेसह तिच्या कन्येवर मुलासमोर बलात्कार केला. बागपत येथे तांत्रिकांनी महिलेसोबत दृष्पृत्य केले. अलिगढमध्ये छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने आत्महत्या केली. पुशीनगरमध्ये 11 वर्षांच्या मुलीच्या अपहरणानंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. जर उत्तर प्रदेश सरकार लोकांच्या सुरक्षा आणि सन्मानपूर्वक जगण्याची खात्री देऊ शकत नाही तर अशा सरकरला सत्तेत राहण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्र दौऱयाच्या नावावर पर्यटन

उत्तर प्रदेश विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते दीपक सिंह यांनीही योगींवर निशाणा साधला. फिल्म सिटीच्या नावावर योगी आदित्यनाथ यांचे महाराष्ट्र पर्यटन सुरू असल्याची टीका दीपक सिंह यांनी केली. बलात्कार, अपहरण, शेतकरी आंदोलन, बेरोजगारी याबाबत प्रश्न विचारले जाऊ नयेत, येथून लक्ष हटविण्यासाठी योगी हे सर्व करीत असल्याची टीका त्यांनी केली.

‘भोगी’
नट घेतील,
नटय़ा घेतील
टॅलेंट कसे घेतील?
फिल्म सिटी ऐवजी
शेवटी डान्सबार नेतील
मंदिरे खूप झाली
इंद्राचा दरबार
हवा आहे
अप्सरांच्या नृत्यासाठी
भोगी सुद्धा
नवा आहे

महाराष्ट्रातील एका कवीने खास ‘सामना’च्या वाचकांसाठी ही कविता पाठवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या