गुंड-बदमाशांनी ‘यूपी’तून चालते व्हावे: आदित्यनाथ

13

गोरखपूर

उत्तर प्रदेशात आता भाजप सत्तेवर आला आहे. आमच्या राज्यात गुंड-बदमाशांना अजिबात थारा मिळणार नाही, असे ठणकावत त्यांनी वेळीच सुधारावे अन्यथा ‘यूपी’तून चालते व्हावे, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज दिला.

आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या गोरखपूर भेटीसाठी आले असता भाजप कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उत्तर प्रदेशात यापुढे फक्त कायद्याचेच राज्य चालेल. रोजगाराची वाणवा राहणार नाही. २४ तास वीज मिळेल, आपला उत्तर प्रदेश खऱया अर्थाने उत्तम प्रदेश बनेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कुठे काही गडबड झाली किंवा दिसली तर थेट मला कळवावे, असेही आदित्यनाथ यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच आदित्यनाथ यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा, असे आवाहनही केले.

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरक्षनाथ मठासमोरच एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून आज आत्मदहनाचा प्रयत्न केला. लोकांनी धाव घेऊन आग विझवल्यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव राजकुमार भारती असून तो बालिया जिल्हय़ातील राजपूर देवरी या गावातील आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आले तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांतून दिले होते. पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱयांच्या कर्जमाफीचा प्रश्न चर्चेलाच आणण्यात आला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या