योगी सरकारला संघानेच झापलं, प्रायश्चित करण्याची मागणी

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधील सरकारी रुग्णालयात झालेल्या ७० बालकांच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरांतून योगी सरकारवर टीका सुरू आहे. मंत्र्यांच्या बेताल उत्तरांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याचा फटका सहन करावा लागत आहे. संघातील अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, पदाधिकारी यांनी गोरखपूरमधील घटनेचा उघड-उघड निषेध केला असून कडक कारवाईची मागणी केली आहे. तसेच याची नैतिक जबाबदारी सरकारची असून त्यासाठी सर्वांनी मिळून प्रायश्चित केले पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अवध क्षेत्रातील संघाचे प्रांत संचालक प्रभू नारायण यांनी एका फेसबुक पोस्टमधून योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. गोरखपूर प्रकरणी तपासात कोणीही दोषी आढळलं, तरी नैतिक जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व मंत्री आणि उत्तर प्रदेश भाजपच्या सदस्यांनी या घटनेचं प्रायश्चित करायलाच पाहिजे, असा आग्रह त्यांनी केला आहे. राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी त्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करावेच. मात्र सर्वांनी मिळून एक दिवस उपवास करून प्रायश्चित करावे. अशा संवेदनशील परिस्थितीचा सामना कसा करावा हे त्यांनी मोदींकडून शिकावं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आता संघाकडूनच टीका होऊ लागल्याने भाजप आणखी अडचणीत सापडला आहे. गोरखपूरच्या घटनेवरून देशभरात भाजपविरोधात वातवरण तापत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या