चहलही लगावू  शकतो उत्तुंग सिक्स, – ‘हिटमॅन’ रोहित शर्माने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य 

‘षटकार ठोकण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आणि पीळदार स्नायू असायला हवे असे काही नाही. चहलसारखा किरकोळ फलंदाजही उत्तुंग  षटकार ठोकू शकतो. त्यासाठी अचूक टायमिंग लागतं. तुमचं डोके स्थिर पाहिजे आणि चेंडू बॅटच्या बरोबर मध्यावर घेता आला पाहिजे, अशा शब्दांत टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने आपल्या धडाकेबाज खेळीचे रहस्य सर्वांसमोर उलघडले.

‘फिरकीवीर’ युझवेन्द्र चहल यांने राजकोटच्या लढतीनंतर रोहितची प्रगट मुलाखत घेतली. त्यात रोहितने षटकार ठोकण्याच्या तंत्राची माहिती चहलला सांगितली. युझवेन्द्र तुला चेंडू टोलवण्याचे योग्य टायमिंग साधता आले तर तुही माझ्यासारखे षटकार ठोकू शकतोस असे सांगून रोहित म्हणाला, कुणी सांगितले उत्तुंग षटकार फटकावण्यासाठी पिळदार शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू असायला हवेत. तुमचे योग्य टायमिंग साधले गेले कि बॅटच्या मध्यावर आलेला चेंडू थेट हवेतून सीमारेषेबाहेर जायलाच हवा. रोहितने गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 लढतीत 43 चेंडूंत 85 धावांची धडाकेबाज खेळी नोंदवली. त्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

षटकारांशी रोहितचे अनोखे नाते

रोहित शर्मा आणि षटकार यांचे क्रिकेट मैदानातील अनोखे नाते जगभरातील क्रकेटशौकिनांना माहित आहे. राजकोटच्या सामन्यात ठोकलेल्या षटकारामुळं रोहितच्या नावावर काही नवे विक्रम नोंदले गेले आहेत. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. 17 डावांमध्ये 37 षटकार ठोकून रोहितने धोनीचा 62 डावांतील 34 षटकारांचा विक्रम मोडला आहे. विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने  26 डावांत 26 षटकार ठोकले आहेत.

2019 या वर्षात सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर जमा झाला आहे. यंदाच्या वर्षात त्याने 66 षटकार मारले आहेत. मागच्या दोन वर्षांतही त्यानेच सर्वाधिक षटकार फटकावले  होते. 2017 मध्ये 65 तर 2018 मध्ये त्यानं 74 षटकार ठोकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या