वडिलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या

31

सामना ऑनलाईन । नागपूर

आईवडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या १४ वर्षीय मुलाने सिलिंगच्या हुकला चादर बांधून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी पाचपाचलीतील बारसे नगरात उघडकीस आली. संचित संजय वाघमारे (१४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय वाघमारे हातमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषन करतात. त्यांचा मुलगा संचित हा सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकत होता. अभ्यासात हुशार असलेल्या संचितला त्याच्या मित्राकडे असलेल्या मोबाईलमुळे वेड लागले होते. तो नेहमी मित्राच्या स्मार्टफोनवर खेळत असायचा. त्यामुळे आपल्याकडेही एक स्मार्टफोन असावा म्हणून त्याने वडिलांकडे स्मार्टफोन घेऊन मागणे सुरू केले.

गेल्या महिन्याभरापासून तो वडिलांकडे मोबाईल घेऊन मागत होता. मात्र, तुटपुंज्या कमाईत मोबाईल घेऊन देणे शक्‍य नसल्यामुळे ते नेहमी मुलाची समजूत घालून त्याची मनधरणी करीत होते. मात्र, मित्रांकडे मोबाईल बघून त्यालाही मोबाईलची उणीव भासत होती. वडील मोबाईल घेऊन देत नसल्यामुळे तो आईकडेसुद्धा मोबाईलसाठी हट्‌ट धरायचा. मोबाईल विकत घेणे शक्‍य होत नसल्याचे लक्षात येताच संचित निराश झाला. गेल्या आठ दिवसांपासून तो तणावात वावरत होता. त्यामुळे संचितने आज शनिवारी सकाळी घरात सिलींगला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या