साखरपुडा झाल्यानंतरही प्रियकराचा त्रास : तरुणीची आत्महत्या

77
suicide

सामना प्रतिनिधी । भंडारा

दुसऱ्याशी साखरपुडा झाल्यानंतरही प्रियकर त्रास देत असल्याने एका तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर या तरुणीने आत्महत्येचा व्हिडिओ तयार करून तिच्या जुन्या प्रियकराला आणि मैत्रीणींनाही पाठविल्याचेही समोर आले आहे. निशा (२१) असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. निशाच्या आत्महत्येला तिचा जुना प्रियकर निखिल बोरकरच जबाबदार असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. मृत निशाचा मोबाईल तपासला असता, तिने आत्महत्येच्या वेळी तयार केलेला हा व्हिडिओ कुणाकुणाला पाठवला याची माहिती सामोर आली आहे.

या घटनेत धक्कदायक बाब म्हणजे, निशा हिचे निखिल बोरकरवर प्रेम होते. मात्र, निखिल हा लग्नासंदर्भात टाळाटाळ करीत असे. त्यामुळे निशाच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले. यानंतर तिचा ३१ डिसेंबरला साखरपुडा झाला आणि ४ फेब्रुवारीला तिचे लग्नही होणार होते. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास निशाने स्वतःच्या खोलीत जाऊन विष घेतले आणि आत्महत्या केली. सकाळी निशा न उठल्याने कुटुंबियांनी तिची पाहणी केली. तेव्हा तिने विष घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या