मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना, पेनकिलर घेताच तब्येत खालावली अन् तरुणीचा मृत्यू

मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना होत असल्याने तरुणीने पेनकिलर घेतल्या. मात्र पेनकिलरचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे तिची तब्येत खालवली आणि तरुणीचा मृत्यू झाला. तामिळनाडूमध्ये त्रिचीतील पुलिवलम भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुसिरी तालुक्यातील एका गावात 18 वर्षीय तरुणीला मासिक पाळीदरम्यान पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. यामुळे तिने पोटदुखीवरील गोळ्या घेतल्या. मात्र गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने तरुणीला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयात नेले. तेथे उपचार करून तिला घरी सोडण्यात आले.

घरी येताच तरुणीची शुद्ध हरपली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला महात्मा गांधी स्मृती शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. औषधांच्या ओव्हरडोसमुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. यानंतर तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.