ठाणे: तरुणीचा विनयभंग करून रिक्षातून फेकले

28
सामना ऑनलाईन । ठाणे
ठाण्यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या धाकावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना बुधवारी घडली आहे. मध्यरात्रीपर्यंत रहदारी असलेल्या तीन हात नाका परिसरात रात्री नऊच्या सुमाराला एका तरुणीचा विनयभंग करून तिला रिक्षातून फेकून दिल्याची घटना घडली आहे. या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे.
चितळसर-मानपाडा परिसरात राहणारी ही २३ वर्षीय तरुणी मुलुंड येथे न्युट्रिशिअन म्हणून काम करते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास तिने घरी जाण्यासाठी शेअर रिक्षा घेतली. रिक्षात आधीच एक प्रवासी होता. रिक्षा काही अंतरावर जाताच त्या प्रवाशाने तरुणीवर अश्लील शेरेबाजी करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याला प्रतिकार करत त्या तरुणीने आरडाओरडा सुरू केला आणि रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या तरुणीला मारहाण करण्यात आली. रिक्षा पोखरण रोड नंबर २ येथील टीसीएस कंपनीच्या गेटजवळ येताच या तरुणीला आरोपीने धावत्या रिक्षातून बाहेर फेकलं.
या घटनेनंतर पोलिसांनी रिक्षाचालक आणि तरुणीच्या बाजूला बसलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीही फूटेजही तपासली जात आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या