
चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. प्रवीण लहाने असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. प्रवीणचा भाऊ हा मुंबई पोलीस दलात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवीण हा मूळचा नाशिकच्या सिन्नर येथील रहिवासी होता. चार दिवसांपूर्वी तो मुंबईत फिरण्यासाठी आल्याचे समजते. बुधवारी रात्री प्रवीण बोरिवली पूर्व येथील एका सोसायटीजवळ गेला होता. सोसायटीच्या गार्डने आणि अन्य पाच जणांनी प्रवीणला चोर समजून बेदम मारहाण केली. चोर पकडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच कस्तुरबा मार्ग पोलीस तेथे गेले.
पोलिसांनी प्रवीणची सुटका करून त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शताब्दी रुग्णालयात पाठवले. तपासणी झाल्यावर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणून बसवले. तेव्हा प्रवीण अचानक खाली पडला. त्याला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी त्या सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याला पाच-सहाजण मारहाण करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. नेमका प्रवीण त्या सोसायटीमध्ये कसा गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रवीणच्या मृत्यूप्रकरणी आज रात्री उशिरा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सोसायटीचा गार्ड आणि अन्य पाचजणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच चार जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस चौकशी करत होते.