शेतातील रस्त्याच्या वादावरुन मारहाणीत जखमी झालेल्या `त्या’ तरुणाचा मृत्यू

शेतातील रस्त्याच्या वादावरून शनिवारी 24 जुलै रोजी दोन गटात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज 31 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्याच्या अटीवर काही काळ  मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील लताबाई पिंटू गावंडे यांनी 24 जुलै रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात गावातीलच तसेच शेता शेजारील रुस्तम म्हातारजी गावंडे, शेषराव कडुबा गावंडे, माणिकराव कडुबा गावंडे, माणिकराव काळुबा गावंडे व गणेशराव शेषराव गावंडे यांनी आम्हाला शेतातून रस्ता देत नाही म्हणून मला व माझ्या पतीसह सासरा व दीर यांना लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली असल्याची फिर्याद दिली होती.

याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता. या हाणामारीत गंभीर जखमी झालेला संजय सखाराम गावंडे याच्यावर संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाकडे आणला जात असताना त्याच्या नातेवाईकांनी सदर मृतदेह भोकरदन न्यायालयासमोर अडवून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीवर काही काळ अडवून धरल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र त्याठिकाणी पोलिसांनी येऊन मध्यस्थी करून आरोपींना अटक करणार असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या