
पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यातून आलेल्या 27 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनच्या आवारातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणीला पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पीडित तरुणी रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या एका बाकावर बसली होती. बाकावर बसूनच तिने आपल्याकडे असलेल्या विषाच्या बाटलीतील विष प्राशन केले. हा प्रकार तेथेच असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने महिला कर्मचारी चंद्रावती शिंदे आणि स्मिता सानप यांना बोलावले. या दोन्हीही महिला कर्मचाऱ्यांनी या तरुणीच्या हातातील विषाची बाटली काढून घेतली.
विष घेतेवेळी ही तरुणी त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो अशी बडबड करत होती. तातडीने जाधव यांनी सदर तरुणीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉ. मनीषा खेडकर यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला तातडीने अहिल्यानगरला हलवण्यात आले.
सदरची तरुणी ही गेल्या दोन दिवसांपूर्वीही पोलीस स्टेशनला येऊन गेली होती. तिच्या सोबत तिचे काही नातेवाईक सुद्धा होते. या वेळी या तरुणीने मला काही तक्रार द्यायची नाही, मात्र माझे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहेत ते डिलीट तरी करा असा आग्रह पोलिसांकडे केला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.