मुली आणि महिलांनी आपत्ती व्यवस्थापन सारख्या क्षेत्रात काम करून समाजात नेतृत्व करावे!

समाजात अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण आपण अनेक आव्हानांनाही सामोरे जात आहोत. जगात युद्धे, दहशतवाद असे प्रश्न असताना भारत मात्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचे नेतृत्व तयार होणार आहे. विशेषतः महिला आणि मुलींनी उद्याच्या प्रगत समाजाचे उद्याच्या नेतृत्व करावे. लातूर किल्लारीमध्ये आलेल्या भूकंपाच्या वेळी देखील महिलांनी कुटुंबीयांना वाचवण्यामध्ये पुढाकार घेतल्याचे दिसून आले एवढेच नव्हे अंदमान निकोबार मधल्या सुनामी मध्ये शाळकरी मुलींनी पुढाकार घेऊन अनेकांचे जीव वाचवल्याची उदाहरणे आहेत यावरून आपणही बोध घेऊन नैसर्गिक स्वरूपाचे आपत्ती व्यवस्थापन आणि समाजाला उपयुक्त अशा उपक्रमांत सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. पिरंगुट परिसरातील श्री विद्या भवन शाळेत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. विद्यार्थिनींना कोणत्याही समस्या असल्यास त्यावर तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार पेटी असावी. यावेळी या शाळेला डॉ. गोऱ्हे यांनी दोन संगणक आणि प्रिंटर देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, पत्रकार पांडुरंग दातीर, ग्राम पंचायत सदस्य विकास गोळे आदी उपस्थित होते.