कुस्तीपटूचा करूण अंत, मृत्यूशी झुंजणारा निलेश कंदुरकर हरला

67

सामना ऑनलाईन, पुणे

कोल्हापूरचा कुस्तीपटू निलेश विठ्ठल कंदुरकर याचा आज सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुस्तीच्या आखाडय़ात एकचक्री डावातून निसटण्याच्या प्रयत्नात मज्जातंतूला दुखापत झाल्याने १९ वर्षांच्या मल्लाची जीवन-मृत्यूच्या मैदानात थेट मृत्यूशी झुंज सुरू होती. ऐन रंगात आलेल्या कुस्तीच्या आखाडय़ात हा प्रकार घडल्याने उपस्थित कुस्तीशौकिनांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

१ एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी श्री. जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त गावांत दरवर्षीप्रमाणे भरविण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानात निलेशची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिन लोटले होते. कुस्ती रंगतदार बनलेली असतानाच प्रतिस्पर्धी पैलवानाच्या एकचक्री डावातून निसटण्याच्या प्रयत्नात निलेश मानेवर पडला, यामुळे त्याच्या मणक्यासह मज्जातंतुला जबर दुखापत झाली. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे बनले होते, त्याला कोल्हापुरातून कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र निलेशच्या मज्जातंतूला इतका जबरदस्त मार लागला होता की त्याने उपचारांनाही प्रतिसाद दिला नाही. अखेर आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. कुस्तीच्या आखाड्यातच तरुण कुस्तीपटूचा असं मरण आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावात निलेशच्या घरी आजोबांपासुनच कुस्तीची परंपरा आहे. वडील विठ्ठल हे सुद्धा पैलवान म्हणुनच पंचक्रोशीत नावाजलेले. त्यामुळे मोठा भाऊ सुहास बरोबरच निलेशनेही तालमीत धडे गिरविले. वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत, तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलातच त्याचा कुस्तीचा सराव सुरु होता. अवघ्या चार ते पाच मिनिटांतच कुस्ती निकाली काढणारा मल्ल अशी निलेशने ख्याती मिळविली होती. त्यामुळे त्याची कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची चांगलीच गर्दी असे.

आपली प्रतिक्रिया द्या