राशी ठरवतात तुमचे करियर

2959

आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतात ज्या फक्त दिवरात्र कामच काम करत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा कामात रमायला त्यांना आवडतं. त्यांच्या या स्वभावामुळे जोडीदाराबरोबर त्यांचे खटके उडत असल्याचेही आपण पाहतो. पण या व्यक्ती काही सुधरत नाहीत. तर या व्यक्तींच्या बरोबर उलट स्वभावाच्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला वावरत असतात ज्यांना नोकरी व कुटुंब यात समतोल राखण्याच तंत्र जमतं. यामुळे या व्यक्ती दोन्ही ठिकाणी आघाडीवर असतात. तर काहीजणांमध्ये दुसऱ्यांना राबवून घेण्याचं कौशल्य असतं तर काहीजण नेहमीच दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यास उत्सुक असतात. पण खरं तर या सगळ्यांसाठी कारणीभूत असते ती तुमची रास. कारण तुमचं करियर तुम्ही नाही तर रास ठरवत असते. जाणून घेऊ या राशींबद्दल.

मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ असून ही अग्नी तत्वाची रास आहे. मेष राशीच्या व्यक्ती साहसी, हट्टी, रागीट ,अभिमानी असतात. हुकमी नेतृत्व असल्याने नेतेपद उत्तम पध्दतीने निभावतात. पोलिस, पत्रकार, डॉक्टर आणि कंत्राटदार या क्षेत्रात मेष व्यक्ती आपला ठसा निर्माण करतात.

वृषभ

या राशीचा स्वामी शुक्र आहे. पृथ्वी तत्वाची ही रास आहे. या राशीच्या व्यक्ती शांत, व्यवहार कुशल पण स्वार्थी असतात. सुखासीन आयुष्य जगण्याची यांना आवड असते. संगीत, कला, नाटक, चित्रपट, सौंदर्याशी निगडीत, राजकीय, मीडिया या क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची धमक यांच्यात असते.

मिथुन

मिथुनचा स्वामी बुध असून वायू तत्वाची ही रास आहे. बोलघेवडे, कुशल योजनाकार, उत्तम वक्ता, हुकमी स्वभाव, विनोद बुध्दी या गुणांमुळे कमी वेळात सगळ्यांशी यांची गट्टी होते. यामुळे सेल्समन, मीडिया, राजकारण, उद्योग धंदा, इंजिनियर या क्षेत्रात यांचे भाग्य लवकर फळते.

कर्क

कर्क राशीचा स्वामी चंद्र असून ही जल त्तत्वाची रास आहे. स्वभावाने शांत, प्रेमळ व संवेधनशील अशी ही रास आहे. आयुष्यात अनेक उतार चढाव बघितल्याने कर्क राशीच्या व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधून काढतात. हॉटेल व्यवसाय, मासेमारीशी, फळांशी, भाज्यांशी संबंधित उद्योगात यांना यश मिळते.

सिंह

राशीचा स्वामी सूर्य असून ही अग्नी तत्वाची रास आहे. धार्मिक, स्पष्टवक्ते, हुकुम गाजवणे यांना चांगले जमते. लोकांकडून काम करुन घेण्यात हुशार असतात. वकील, ज्वेलर्स, पत्रकार, राजकारण, मॉडेलिंग या क्षेत्रात सिंह व्यक्ती नाव कमावतात.

कन्या

राशीचा स्वामी बुध असून ही पृथ्वी तत्वाची रास आहे. सुंदर, भावुक, लाजाळू असलेल्या कन्या व्यक्ती क्रीडा, पायलट, मनोवैज्ञानिक या क्षेत्रांबरोबरच अकाऊंटसमध्ये चांगले करियर करतात.

तूळ

या राशीचा स्वामी शुक्र असून वायू तत्वाची रास आहे. ऐश्वर्य संपन्न आयुष्य जगण्याकडे यांचा कल असतो. सुंदर, आकर्षक व्यक्तीमत्व असलेल्या तूळ व्यक्ती सराफ, मॉडेलिंग, चित्रपट-नाटक याचबरोबर फर्निचर व हॉटेलशी संबंधित व्यवसायात प्रगती करतात.

वृश्चिक

या राशीचा स्वामी मंगळ असून याची जल तत्व रास आहे. रागीट, हट्टी व प्रसंगानुरुप वागत असल्याने या व्यक्ती सर्वच प्रसंग निभावून नेतात. साहसी, कष्टाळू व उत्साही असल्याने मीडिया, सरकारी नोकरी,नौदल या क्षेत्रात नाव कमावतात.

धनु

या राशीचा स्वामी गुरु असून ही अग्नि तत्वाची रास आहे. या व्यक्तींचा आत्मविश्वास प्रचंड असतो. तसेच ते साहसी व महत्वाकांक्षी असतात. पण रागीट स्वभावामुळे स्वतःचे नुकसान करुन घेतात. वकीली ,राजकारण, बँक, सल्लागार, ज्योतिष, मार्केटींग या क्षेत्रात धनु रास अग्रेसर ठरते.

मकर

या राशीचा स्वामी शनिदेव असून ही पृथ्वी तत्वाची रास आहे. महत्वाकांक्षी पण सतत नकारात्मक विचार करण्याची यांना सवय असतात. सहनशील स्वभाव असतो. या व्यक्ती सरकारी-खासगी नोकरी, तेल कंपन्या, विज्ञान, कृषी या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावतात.

कुंभ

कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असून ही वायू तत्वाची रास आहे. शांत, परोपकारी स्वभाव असल्याने यांचा मोठा जनसंपर्क असतो. सतत दुसऱ्यासाठी काहीना काही करत असतात. सरकारी नोकरी, वाणिज्य क्षेत्र, पर्यटन, लिखाण यात नाव कमावतात.

मीन

या राशीचा स्वामी गुरु असून ही जल तत्वाची रास आहे. मनमिळावू ,दयाळू व परोपकारी स्वभावाचा कामात उपयोग करुन घेतात. सरकारी नोकरी, संशोधक, तज्ज्ञ, नाट्यसिनेमात लिखाण करणे यांच्यासाठी फायदेशीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या