महिलेचा खून करून पाय तोडले, कर्ज फेडण्यासाठी कडे चोरणाऱ्या तरुणाला अटक

जवळपास 3 महिन्यांपूर्वी राजस्थानातील जयपूरमध्ये एका महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या महिलेला ठार मारल्यानंतर तिचे दोन्ही पाय तोडण्यात आले होते. या महिलेच्या पायातील कडे गायब असल्याने मारेकऱ्याने या कड्यांसाठीच महिलेचे पाय तोडले असावेत असा पोलिसांना संशय होता. खेतपुरा भागात झालेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. पवन कुमार असं आरोपीचे नाव आहे.

मयत गीतादेवी ही गुरं चरायला गेली होती. यावेळी पवन कुमारने तिच्या डोक्यावर आणि मानेवर वार करून तिला ठार मारलं होतं. यानंतर त्याने तिचे पाय तोडून तिच्या पायातील चांदीची कडी चोरली होती. अंगावर काटा आणणाऱ्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांना बरीच धावपळ करावी लागली होती. पोलिसांनी पवन कुमार याच्या घरच्यांनाही अटक केली असून त्यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गीता देवी यांच्या शरीरावर 15 ठिकाणी धारदार शस्त्राच्या जखमा दिसून आल्या होत्या.

आरोपी पवन कुमार हा वाया गेलेला होता. त्याला मोबाईलवर तीन पत्ती नावाचा गेम खेळायचं व्यसन लागलं होतं. मोबाईलवरील या जुगारात तो 20 हजार रुपये हरला होता. पवन कुमारच्या डोक्यावर बरंच कर्ज झालं होतं, जे फेडण्यासाठी त्याला तातडीने पैशांची गरज होती. पवन कुमार हा गीता देवी यांना ओळखत होता. त्यांच्या अंगावर दागिने असतात हे देखील त्याला माहिती होतं. यामुळे त्याने त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा खून केला होता. पवन कुमार याने कुऱ्हाडीने त्यांचे पाय कापले आणि पायातील कडे घेऊन तो पळून गेला होता.

गीता देवी शर्मा यांच्या अगावर सोन्याचे दागिने होतेच शिवाय त्यांच्या पायामध्ये 1.25 किलो वजनाचे चांदीचे कडेही होते. त्यांची हत्या झाल्यानंतर राजस्थानात राजकीय रणकंदन माजलं होतं. या हत्येवरून सत्ताधारी काँग्रेस पक्षावर भाजपने कडवट टीका केली होती. राजकीय दबावामुळे प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढल्याने पोलिसांनी आरोपी शोधून काढण्यासाठी तब्बल 400 पोलिसांचे पथक तयार केले होते. पोलिसांनी आरोपी शोधून काढण्यासाठी 30 पथके तयार केली होती. या पथकात 4 अतिरिक्त अधीक्षक, 8 पोलीस उप अधीक्षक 15 निरीक्षक आणि राजस्थान पोलिसांच्या सशस्त्र दलाच्या 2 तुकड्यांचा समावेश होता. याशिवाय श्वान पथक फॉरेन्सिक दल, सायबर पोलिसांचे दल ही देखील या गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदतीस देण्यात आले होते.

या हत्याकांडाचा निषेध करत भाजप नेत्या वसुंधराराजे शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की ‘लुटीसाठी महिलेची करण्यात आलेली हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. ही सरकारसाठी लाजिरवाणी घटना असून यामुळे समाजामध्ये दहशत निर्माण झाली आहे.’ केंद्रीय मंत्री आणि जयपूर ग्रामीणचे खासदार राज्ययवर्धन राठोड यांनी बुधवारी गीता देवी हिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनीही काँग्रेस सरकारवर टीका केली.