स्टेट बँकेची ‘नकली ब्रँच’ उघडली, 19 वर्षांच्या तरुणाला अटक

1523
प्रातिनिधिक फोटो

आजवर आपण नकली नोटा, नकली डेबिट-क्रेडिट कार्ड्स ऐकली असतील. पण, तमिळनाडूमध्ये तर चक्क एका बँकेची बनावट शाखा उघडल्याची घटना घडली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानसार, या प्रकरणी 19 वर्षांच्या कमल बाबू नावाच्या तरुणासह अन्य दोन जणांना अटक झाली आहे. तमिळनाडूतील पनरुती येथे ही घटना घडली आहे. कमल बाबू हा स्वतः एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याने पनरुती येथे एक गाळा घेऊन त्यात कॉम्प्युटर, लॉकर, चलान आणि नकली दस्तऐवजांसह अन्य सामग्री जमवली आणि दोन साथीदारांसह पनरुती बझार ब्रँच या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन शाखा सुरू केली.

या बँकेतून काही व्यवहारही करण्यात आले. जेव्हा एका खातेदाराने त्याला या नकली शाखेतून मिळालेल्या एका पावतीविषयी विचारणा केली तेव्हा या घटनेची कुणकुण एसबीआयला लागली. त्या खातेदाराने बँकेला ही पावती नवीनच उघडलेल्या शाखेतून घेतल्याचं सांगितलं आणि बँक अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते तडक त्या बँकेच्या शाखेत गेले तेव्हा त्यांना धक्का बसला. तिथे एसबीआय शाखेप्रमाणेच सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तेव्हा कमल बाबूसह ए. कुमार आणि एम. मणिकम अशा दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल याला बँकेच्या सर्व व्यवहारांची तपशीलवार माहिती होती. त्याला स्वतःची बँक काढायची इच्छा होती, म्हणून त्याने ही नकली ब्रांच बनवली. त्याने कोणालाही पैशांसाठी लुबाडल्याची तक्रार अद्याप बँकेच्या कोणत्याही ग्राहकाने केलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याची निश्चित माहिती कळू शकेल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या