रस्त्याच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी माढ्यामध्ये ‘गांधीगिरी’

माढा -शेटफळ रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या दूरवस्थेला जबाबदार असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माढा तालुका युवक काँग्रेसतर्फे रांगोळी काढून व वाहनचालकांना गुलाबपुष्प दिले. या ‘गांधीगिरी’तून प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. माढा-शेटफळ रस्त्यावरून उपळाई बु., मोडनिंब, शेटफळ, पंढरपूरकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने दूरवस्था झाली आहे.  दुचाकी ,चारचाकी वाहन चालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता जास्त असते.

प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सोमवारी माढा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्डाभोवती रांगोळी काढून व वाहन चालकांना गुलाबपुष्प देत अनोखे आंदोलन केले. यानंतरही प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात माढा तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष जहीर मणेर, विधानसभा काँग्रेस उपाध्यक्ष शाहूराजे जगताप, मागासवर्गीय विभाग तालुकाध्यक्ष तुकाराम देवकुळे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अनिल गवळी, अविनाश शिंदे, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष सचिन खैरे-पाटील, इंटकचे तालुकाध्यक्ष योगेश भांगे,युवकचे अमर राखुंडे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गावकरी उपस्थित होते.माढा-शेटफळ रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. तरीही संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून तातडीने या रस्त्यावरील खड़े बुजवावेत अशी मागणी माढा तालुका काँग्रेस समिती उपाध्यक्ष जहीर मणेर यांनी केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या