लग्नासाठी शेजारी करत होता आडकाठी; तरुणाने जेसीबीने दुकान केले उद्ध्वस्त

प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते, असे म्हणतात. मात्र, लग्नामध्ये आडकाठी ठरणाऱ्या शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी तरुणाने त्याचे उदरनिर्वाहाचा एकमेव साधनच नष्ट केले आहे. शेजारी लग्नामध्ये आडकाठी करत असल्याचा राग तरुणाच्या मनात होता. या रागातूनच त्याने शेजाऱ्याचे दुकाने जेसीबीने उद्ध्वस्त केले. ही घटना केरळमध्ये घडली. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

केरळच्या कन्नूर जिल्ह्यात चेरुपुझा भागात लग्नात आडकाठी ठरणाऱ्या शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी तरुणाने हे कृत्य केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अल्बिन या 30 वर्षांच्या युवकासाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येत होते. मात्र, शेजारी काहीतरी कारणे शोधत लग्नासाठी आडकाठी करत होता. त्यामुळे या शेजाऱ्याबाबत अल्बिनच्या मनात राग होता.

शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी त्याने शेजाऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले दुकानच जेसीबीद्वारे उद्ध्वस्त केले आहे. दुकान उद्ध्वस्त करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओही अपलोड केला आहे. त्यात दुकानात अनेक अवैध धंदे चालत असल्याने आपण ते नष्ट करत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यानंतर लगेचच त्याने जेसीबीने शेजाऱ्याचे दुकान उखडल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी अल्बिनला अटक केली आहे. दुकानाचा वापर जुगार खेळणे, मद्यपान करणे आणि इतर अनेक अवैध धंद्यासाठी केला जात होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाकडे याविरोधात तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे अल्बिनने पोलिसांना सांगितले.

अल्बिनने केलेल्या दाव्यांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे. मात्र, त्याने केलेले कृत्य समाजविघातक असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्बिनला लग्नासाठी आलेल्या अनेक प्रस्तावांमध्ये शेजाऱ्याने आडकाठी केली होती. त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचेही त्याने जबाबात सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या