वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील कारने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. उमा शंकर रोहिणी प्रसाद शुक्ला असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

उमा शंकर हा मध्य प्रदेशचा रहिवाशी होता. तो डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. आज पहाटे उमा शंकर हा जोगेश्वरी पश्चिमच्या लोटस पेट्रोल पंप परिसरात आला होता. तेव्हा त्याच्या मोटरसायकलला वाहनाने धडक दिली. त्या धडकेत उमा शंकर हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालक काही अंतर जाऊन थांबला. त्यानंतर मालवणी येथे राहणाऱ्या रिक्षा चालकाने उमा शंकरला कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उमा शंकरला मृत घोषित केले.

अपघाताची माहिती समजताच ओशिवरा पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी उमा शंकरच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. अपघात प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला.